लाखोंच्या उत्साहात कडेगावमध्ये गगनचुंबी ताबुतांच्या भेटी 

लाखोंच्या उत्साहात कडेगावमध्ये गगनचुंबी ताबुतांच्या भेटी 

कडेगाव - डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा आनंदसोहळा आज राज्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखांवर भाविकांनी अनुभवला. दुला दुला व मौला अली झिंदाबादच्या जयघोषात आज मोहरमनिमित्तचा हा भेटीचा सोहळा संपन्न झाला.

पावणे दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरम निमित्त सोहोली, निमसोड व शिवाजीनगर येथील मानकऱ्यांनी आज सकाळी पारंपारिक पध्दतीने वाद्यांच्या गजरात ताबूतांची पूजा केली. त्यानंतर दुपारी अकरा वाजता सातभाईंचा मानाचा ताबूत प्रथम उचलण्यात आला आणि ताबूत भेटीचा सोहळ्याला प्रांरभ झाला. 

साडेअकरा वाजता बागवान यांचा ताबूत उचलण्यात आला. आणि या दोन्ही ताबूतांची पटेल चौकात बारा वाजता पहिली भेट झाली. हे ताबूत मिरवणुकीने मुख्य भेटीच्या ठिकाणी निघाले असता वाटेत शेटे, आत्तार, देशपांडे, हकीम, तांबोळी यांचेही ताबूत मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर सुरेशबाबा देशमुख चौकात शेख-इनामदार तसेच सुतार यांचे सर्वात उंच ताबूत व मजूदमाता ताबूतही दाखल झाले.

देशमुख, शिंदे, शेटे, देशपांडे, कुलकर्णी आदी मानकऱ्यांनी पंजे भेटीच्या ठिकाणी आणले. यावेळी बुधवार पेठ मेल व शुक्रवार पेठ मेल यांच्यात नाथपंथीय गीतांचे सामने झाले. तसेच राष्ट्रीय एकात्मतेची गीते गायली गेली. मानकऱ्यांनी ताबूतांचे पूजन केल्यानंतर दुपारी दीड वाजता महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून आलेल्या सुमारे लाखांवर भाविकांच्या अलोट उत्साह ओसंडून वाहत होता. बागवान यांचा ताबूत जागेवर पोहोचल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. 

यावेळी आमदार विश्‍वजित कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिह देशमुख, आमदार मोहनराव कदम, चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, गुलाम पाटील, विजय शिंदे, जितेश कदम, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड , जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद शरद लाड, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, तहसिलदार अर्चना शेटे, नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, उपनगराध्यक्ष साजीद पाटील, पंचायत समितीचे सदस्य आशिष घार्गे, धनंजय देशमुख, इंद्रजित साळुंखे, रवींद्र देशपांडे, मुख्याधिकारी चरण कोल्हे, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आदी मान्यवर तसेच लाखांवर हिंदु-मुस्लीम भाविक उपस्थित होते. नगरसेवक सागर सूर्यवंशी यांनी स्वागत केले. नगरसेवक राजू जाधव शिंदे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com