कळंबा कारागृहाच्या गहिवरल्या भिंती...

kalamba-jail
kalamba-jail

कोल्हापूर - ‘बाळा किती मोठा झालास, ये माझ्या जवळ ये...’ म्हणत मुलांना हुंदके देत कवटाळणारे बंदिजन, त्यांना खाऊ भरवणारे आणि बाटलीने दूध पाजणारे त्यांचे हात, ‘बाळा शिकून खूप मोठा हो, चांगली संगत कर, कुणावर रागवू, चिडू नकोस, अन्‌ मी येईपर्यंत आईला दमवू नकोस...’ असे त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे उपदेशाचे बोल... असे भावनाविवश करणारे वातावरण आज कळंबा कारागृहाच्या परिसराने प्रथमच अनुभवले. निमित्त होतं बंदिजन व त्यांच्या मुलांची गळाभेट कार्यक्रमाचं.

रागाच्या भरात केलेल्या एका चुकीमुळे चार भिंतीच्या आत बंदिजन अडकून पडतात. कुटुंबापासून दुरावतात. यातील काही बंदिजन शिक्षा भोगून कारागृहबाहेर जाणार असतात. भविष्यात ते चांगले नागरिक म्हणून समाजात जावे, त्यासाठी त्यांना कुटुंबाची आणि कर्तव्याची जाणीव व्हावी, याच उद्देशाने कारागृह उपमहानिरीक्षक भूषणकुमार उपाध्ये यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली. याचाच भाग म्हणून कळंबा कारागृह प्रशासाने बंदिजन व त्यांच्या मुलांची गळाभेट कार्यक्रम आज घेतला. कारागृहातील १७०० पैकी जन्मठेपेसारखी शिक्षा भोगणाऱ्या बंदिजनांना त्यांच्या पाल्यांना भेटण्याची मुभा या कार्यक्रमाअंतर्गत दिली. कारागृहातील २१५ बंदिजनांनी भेटीसाठी अर्ज केला. प्रशासनाने दूरध्वनी व पत्राद्वारे त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. आज त्यातील  सोळा वर्षाखालील आणि दोन वर्षाच्या १३८ मुलांना घेऊन आलेल्या पालकांनी बंदिजनांची भेट घेतली. सकाळी नऊ वाजल्यापासून कुटुंबीय मुलांना घेऊन कारागृहात भेटीसाठी आले होते. अनेक वर्षांनंतर आपल्या बाबांना भेटायचे, त्यांना शाळेत पडलेले मार्क सांगायचे, सायकल पोहण्यात कसा तरबेज आहे ते सांगायचे; इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून खाऊ घ्यायचा अशा उत्सुकतेने मुलेही छान छान कपडे घालून कारागृहात आली होती. 

कित्येक वर्षांनंतर मुलांची भेट होणार, त्यांच्यासाठी खाऊ घेऊन बंदिजनही कारागृहात सकाळपासून प्रतीक्षेत होते. सकाळी सुमारे दहाच्या सुमारास गळाभेट कार्यक्रमास सुरवात झाली. कारागृहात आत येणाऱ्या मुलांना ‘अरे विकी, पप्पू, पिंटू, गुड्डी...’ अशा प्रेमळ हाका मारत बंदिजन बोलावून घेत होते. भरलेल्या डोळ्यांनी मुलांना पाहून त्यांना कवटाळणाऱ्या बंदिजनांच्या तोंडातून हुंदके बाहेर पडू लागले. मुलांना डोळे भरून पाहत ते त्यांना मांडीवर घेऊन बसले. ‘बाळा कसा आहेस रे, तुला भेटता येत नाही, मला तुझी आठवण खूप येते’... असे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले. पण ‘बाबा तुम्ही घरी कधी येणार...?’ या मुलांच्या प्रश्‍नाने ते नि:शब्द होत होते. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून मुलांच्याही डोळ्यातून पाण्याच्या धारा बाहेर पडत होत्या. त्यामुळे कारागृहातील वातावरणही भावनिक बनले. पण वेळीच बंदिजन ‘बाळा, माझ्या हातून चूक झाली आहे, मी लवकरच घरी येईन, तुला काय हवंय ते विकत आणून देईन, थोडासा धीर धर’... अशा प्रकारे मुलांची समजूत काढत ते स्वतःच्या हाताने मुलांना खाऊ भरवू लागले. कारागृह प्रशासनाने घेतलेल्या या कार्यक्रमाने आमच्यातील माणूस जागा केल्याच्या भावनाही त्यांच्याकडून व्यक्त होत होत्या. कार्यक्रमासाठी कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. 

मुलीच्या वाढदिवसाचा स्वतः बनविला केक
नऊ वर्षे कारागृहात शिक्षा भोगत असणारा बंदिजन अरविंद सोनार याची मुलगी सायलीचा आज वाढदिवस होता. गळाभेट कार्यक्रमांतर्गत मुलीची भेट तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मिळणार या आनंदाने अरविंदने काल स्वतःच्या हाताने केक बनविला. तो केक आज या कार्यक्रमात मुलीने कापला. नऊ वर्षांत पहिल्यांदा मुलीचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्याच्या भरल्या डोळ्यांतून व्यक्त होत होता.

कारागृहातील बंदिजनांचे मानसिक संतुलन ठीक राहावे, त्यांना कुटुंबाबतच्या जबाबदारीची जाणीव व्हावी, जेणेकरून भविष्यात ते चांगले नागरिक बनावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.  
- शरद शेळके, कारागृह अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com