फसवे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांचे की नगराध्यक्षांचे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

कऱ्हाड - मुख्याधिकाऱ्यांची आठ दिवसांत बदली करण्यात येईल, कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घ्यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिल्याचे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी सांगितल्यावर येथील पालिका कर्मचाऱ्यांनी सातव्या दिवशी उपोषण व कामबंद आंदोलन मागे घेतले. या आश्‍वासनाला ११ दिवस उलटून गेले. मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवरून पुन्हा काल पालिकेत हजरही झाले. त्यामुळे बदलीसंदर्भात नगराध्यक्षांनी दिलेले आश्‍वासन फसवे ठरले की काय, याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.  

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. १२ जून रोजी पालिकेतील तीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण तर उर्वरित कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू ठेवले. आंदोलन व पालिका पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीच्या केलेल्या ठरावाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी श्री. औंधकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांची बदली होईपर्यंत उपोषण व आंदोलन मागे घेणार नसल्याची कर्मचाऱ्यांनी भूमिका घेतली. मात्र, तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आंदोलनाच्या सातव्या दिवशी १८ जून रोजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपोषणस्थळी गेले. त्यावेळी नगराध्यक्षा शिंदे यांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याशी दूरध्वनी झाला असून, त्यावर मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत मुख्याधिकाऱ्यांची बदली करणार असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्‍वास ठेवत उपोषण व आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे श्री. औंधकर यांची आठ दिवसांत बदली होणार असल्याची शहरात चर्चाही सुरू झाली. 

दरम्यान, श्री. औंधकर यांची सक्तीची रजाही संपल्यामुळे काल ते पालिकेत पोलिस बंदोबस्तात दाखल झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करत ठिय्या मारला.  वास्तविक नगराध्यक्षांकडून मिळालेल्या आश्‍वासनाला ११ दिवस पूर्ण झाले आहेत. आठ दिवसांत होणारी बदली अद्याप न झाल्याने पालिका वर्तुळातही श्री. औंधकर यांच्या बदलीबाबत साशंकता निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे आठ दिवसांत बदलीचे आश्‍वासन फसवे होण्याची भीती व्यक्त होवू लागली आहे. हे फसवे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले की नगराध्यक्षांनी, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.