आरोग्य केंद्रांऐवजी आता ग्रामीण रुग्णालयांत प्रसूती

आरोग्य केंद्रांऐवजी आता ग्रामीण रुग्णालयांत प्रसूती

कऱ्हाड - प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशिक्षित डॉक्‍टरांचा अभाव आणि माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत होणाऱ्या प्रसूती आता थेट उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, कऱ्हाड व फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता आरोग्य केंद्रावरील प्रसूतींचा भार कमी होऊन सुरक्षित प्रसूती, माता आणि बालमृत्यू रोखण्यास हातभार लागणार आहे. 

ग्रामीण भागातील वाडी- वस्तीवरील रुग्णांच्या प्राथमिक उपचारासाठी मोठ्या गावांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ७१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४०० वर आरोग्य उपकेंद्र आहेत. त्याद्वारे रुग्णांना सेवा दिली जाते. ग्रामीण भागातील महिलांची त्यांच्या परिसरातच प्रसूतीची सोय व्हावी, यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि काही ठिकाणी उपकेंद्रातही प्रसूतीची सोय केली होती. मात्र, ती करताना तज्ज्ञ, प्रशिक्षित डॉक्‍टर नसणे, अनेकदा तांत्रिक बाबींमुळे संबंधित बाळाचा आणि त्याच्या आईचाही मृत्यू होणे यासारखे प्रकार घडत होते. त्याचा विचार करून आरोग्य विभागाने आता माता व बालमृत्यू रोखण्याबरोबर प्रशिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्‍टरांद्वारेच महिलांची प्रसूती व्हावी, यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याद्वारे आता प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांत होणाऱ्या प्रसूती उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रकल्प म्हणून कऱ्हाड व फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती करण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

महिलांसाठी वाहनांची सोय 
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्रांना एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत महिलांची प्रसूती होणार आहे, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून उपजिल्हा रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिकेतून सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित वाहनांची अडचण असल्यास १०८ या रुग्णवाहिकेचीही मदत घेण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सध्या सुरू झाली आहे.    

अन्य तालुक्‍यांतही कार्यवाही 
प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्यामुळे कऱ्हाड व फलटण तालुक्‍यांतील आरोग्य केंद्रातील प्रसूती बंद करून सध्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात येत आहेत. तेथे तज्ज्ञ डॉक्‍टरांद्वारे प्रसूती केली जात आहे. दोन्ही तालुक्‍यांतील यशानंतर जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांतही याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे महिलांची चांगली सोय होऊन माता व बालमृत्यू रोखण्यातही यश येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com