मनोहर शिंदेंना खिंडीत पकडण्याचा डाव

मनोहर शिंदेंना खिंडीत पकडण्याचा डाव

कऱ्हाड - कऱ्हाडच्या विकासाला अधोरेखित करत कऱ्हाड पालिकेत मिळालेल्या यशामुळे मलकापूर नगरपंचायतीतही नगराध्यक्ष करण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांचा गट त्यासाठी पुढे सरसावला आहे. मलकापुरात जोरदार गटबांधणी सुरू आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक व विद्यमान उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांना गट पातळीवरच आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक २०१३ मध्ये झाली. त्यावेळी आता भाजपमध्ये असलेले अतुल भोसले हे काँग्रेसमध्ये होते. मनोहर शिंदे व आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाशी एकत्र येवून त्यांनी आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली. १७ विरुद्ध शून्य असा निकाल लागला. पुढे विधानसभा निवडणुकीत बदललेल्या सत्तेच्या राजकारणामुळे अतुल भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारीही दिली. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण व ज्येष्ठे नेते माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर मलकापूर नगरपंचायतीत सवतासुभा सुरू झाला. भोसले यांना मानणारे सहा नगरसेवक बाजूला झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपनेच शड्डू ठोकून चव्हाण गटाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. मनोहर शिंदे यांच्या गटाला आव्हान देण्यासाठी मिळेल ती संधी घेण्याचा व त्यातून कार्यकर्त्यांत वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न भाजप व भोसले गट करताना दिसत आहे.

मलकापुरात सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सत्ता आहे. तेथे काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे नेतृत्व करत आहेत. त्यांनाच आव्हान निर्माण करून चव्हाण गटाला खिंडीत पकडण्याची खेळी केली जात आहे.

मलकापूरच्या निवडणुका सव्वा वर्षावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. काही दिवसांपूर्वी भोसले यांनी तेथील पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. त्यामागे राजकीय गट मजबूत करण्याचाच उद्देश दिसतो. 

भोसले व त्यांच्या गटाने मलकापुरातील भाजपच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकारी निवडी केल्या. भाजपच्या मलकापूर शहराध्यक्ष, भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, सरचिटणीस, ओबीसी आघाडीचा तालुकाध्यक्ष निवडण्यात आले. त्या बैठकीत पदाधिकारी निवडीत बहुतांश फोकस हा मलकापूरवरच होता. काँग्रेसकडून अद्याप त्याला प्रत्युत्तर दिलेले नाही.

बाळासाहेब पाटील व उंडाळकर गटाकडेही लक्ष
मलकापुरात काही ठिकाणी कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणाराही वर्ग आहे. त्याला सोबत घेण्यासाठी मनोहर शिंदे यांचा गट प्रयत्नशील आहे. ज्येष्ठ माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांची भूमिका व त्यांना मानणारा मोठा गट काय करणार, यावरही बरेच काही अवलंबून आहे. पडघम वाजण्यासाठी वर्षभराचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे प्रत्येक गटाची बांधणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी प्रत्येक गट झटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com