हातउसन्या साहित्यातूनच मगर पकडण्याची मोहीम फत्ते!

हातउसन्या साहित्यातूनच मगर पकडण्याची मोहीम फत्ते!

कऱ्हाड - एखाद्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना पूर्ण तयारीनिशी असणे आवश्‍यक असते. मात्र, शासकीय यंत्रणेत अनेकदा आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना त्रुटी पाहायला मिळतात. हीच अवस्था सैदापूर येथे मगर पकडण्यासाठी आलेल्या वन विभागाची होती. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी मोकळ्या हातानेच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिकांच्या मदतीने साहित्य जमवून मगर पकडण्याची मोहीम फत्ते करण्यात आली. तरीही वन विभागाकडील आपत्कालीन व्यवस्थापनातील त्रुटी पुन्ही समोर आल्या.

सैदापूर येथे खोडशी बंधाऱ्यालगत शनिवारी (ता. १८) रात्री नऊच्या सुमारास दोन मगरी बाहेर रस्त्यावर आल्याचे एका व्यक्तीने पाहिले. त्यानंतर सैदापूर-विद्यानगर परिसरात मगर शेतात असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. वन विभागालाही माहिती मिळाली. वनपाल संतोष जाधवर, वनरक्षक सुजित गवते, तानाजी मोहिते, विक्रम निकम, दादाराव बर्गे आदी तातडीने घटनास्थळी आले. त्यानंतर वन्य जीवप्रेमी रोहन भाटे घटनास्थळी दाखल झाले. सुरवातीचा काही वेळ पहिली मगर शोधण्यात गेला. त्यानंतर दुसरी मगर शोधायला खूप वेळ लागला. रोहन भाटेंनी मगर पकडण्यासाठी पोती, दोरी, काठ्यांची आवश्‍यकता असल्याचे सांगताच वन कर्मचाऱ्यांची साहित्यासाठी धावाधाव सुरू 

झाली. सैदापुरातील युवकांनी तसेच शेतकऱ्यांनी दोरी, पोती, बॅटरी, काठ्या आणून दिल्यावर मगर पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली. वास्तविक मगर असल्याची माहिती मिळताच वन विभागाकडे प्राथमिक तयारीच्यादृष्टीने आवश्‍यक साहित्य असणे गरजेचे होते. मात्र, तेथील झाडाच्या फांद्या तोडून काठ्या जमवण्यात आल्या. मगर पकडण्याच्या राबवलेल्या मोहिमेमुळे वन विभागाच्या तयारीची मर्यादा दिसून आली.

मगरीऐवजी एखादा हिंस्त्र प्राणी असता तर वन विभागाकडे त्याला जेरबंद करण्यासाठीची तयारी काय? असा प्रश्‍न उपस्थितांतून केला गेला. त्यामुळे सैदापूरच्या घटनेनंतर वन विभागाने आपत्कालीन स्थितीचा सामना करताना किमान पूर्वतयारी ठेवण्याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे दिसून आले. त्याबाबत वरिष्ठांनीही दखल घेण्याची गरज आहे.   

अतिउत्साही बघ्यांचा त्रास
सैदापूरमध्ये रात्री बारापर्यंत गर्दी वाढतच होती. या अतिउत्साही बघ्यांच्या त्रासाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. युवकांनी गोंधळ व आराडाओरडा करण्यामुळे मगर पकडण्याच्या कामात अनेकदा अडचणी आल्या. अनेकदा हटकूनही मगरीच्या अगदी जवळ येणाऱ्या बघ्यांमुळे पकडण्याच्या कामात व्यत्यय येत होता. काही जण मोबाईलवर शूटिंग करत होते, तर काही फोटो घेण्यासाठी धडपडत होते. गर्दीमुळे मगर पकडण्यास अडचण येत असल्याची माहिती देऊनही पोलिस मगर पकडल्यानंतर घटनास्थळी आले. पोलिसांच्या या तत्परतेचीही चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com