कऱ्हाडला ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड - शहरातील रखडलेल्या कामांवर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीच लक्ष घातले आहे. त्यामुळे त्या कामांना गती मिळण्याची शक्‍यता आहे. काम व त्याचा दर्जा नगराध्यक्षा स्वतः कामाच्या ठिकाणी जावून पाहत आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामांना गती मिळू लागली आहे. त्यासह नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी त्यांनी कालपासून थेट नागरिकांशी संवाद साधण्यासही प्रारंभ केलेला आहे. प्रत्येक मंगळवारी ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ हा उपक्रम त्यांनी जाहीर केला आहे. त्याचे शहरातून स्वागत होत आहे. पालिकेतील त्यांच्या पक्षातील सदस्य त्यांच्या सोबत आहेत.

कऱ्हाड - शहरातील रखडलेल्या कामांवर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीच लक्ष घातले आहे. त्यामुळे त्या कामांना गती मिळण्याची शक्‍यता आहे. काम व त्याचा दर्जा नगराध्यक्षा स्वतः कामाच्या ठिकाणी जावून पाहत आहेत. त्यामुळे पालिकेच्या कामांना गती मिळू लागली आहे. त्यासह नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी त्यांनी कालपासून थेट नागरिकांशी संवाद साधण्यासही प्रारंभ केलेला आहे. प्रत्येक मंगळवारी ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ हा उपक्रम त्यांनी जाहीर केला आहे. त्याचे शहरातून स्वागत होत आहे. पालिकेतील त्यांच्या पक्षातील सदस्य त्यांच्या सोबत आहेत. मात्र, अन्य सदस्य त्याकडे कसे पाहतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. 

पालिकेची अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यात काही ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे काही कामे अंतिम टप्प्यात असूनही ती रखडवली जात आहेत. त्याबाबत मध्यंतरी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जोरदार चर्चा झाली. त्यानंतर नगराध्यक्षा शिंदे यांनी थेट लोकांशी संवाद साधण्याचे ठरवले. त्याबाबत त्यांच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी ही बाब त्यांच्या सहकारी सदस्यांना सांगितली. त्याला ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पाठिंबा देत सहमती दर्शवली. ती गोष्ट बाहेर कोणास सांगितली नाही. त्यांनी थेट प्रत्यक्ष कालपासून कामास सुरवात केली. त्यांनी कालच्या पहिल्या मंगळवारी भाजी मंडई परिसरात भेट दिली. तेथील काय कामे अर्धवट आहेत, त्याची पाहणी केली. व्यापाऱ्यांना नेमक्‍या काय सुविधा अपेक्षित आहेत? तेथे काय तातडीच्या सुविधा देता येतील, याची त्यांनी पाहणी केली. तातडीच्या सुविधा त्वरित देण्याबाबतचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार तातडीच्या सुविधा येत्या आठ दिवसांत त्या भागात देण्यात येतील. त्यांच्यासोबत पालिकेचे अधिकारीही होते. त्यामुळे त्यांना त्या समस्यांचे अवलोकन झाले आहे. 

नगराध्यक्षा शिंदे यांनी कालपासून सुरू केलेल्या नगराध्यक्षा आपल्या दारी उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे. यापूर्वी लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्षा शारदा जाधव यांच्या २००१ च्या कालावधीत ‘पालिका आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला होता. पालिकेचे अधिकारी, प्रत्येक वॉर्डातील नगरसेवक व स्वतः नगराध्यक्ष त्या मोहिमेत सहभागी होत असत.

आठवड्यातील एक दिवस त्यासाठी राखीव होता. काही दिवस ती योजना चांगली चाललीही, त्या माध्यमातून अनेक कामे त्यावेळी मार्गी लागली होती. त्यानंतर आता तब्बल १६ वर्षांनी पुन्हा त्याच धाटणीचा कार्यक्रम हाती घेवून नगराध्यक्षा शिंदे लोकांपुढे येत आहेत. त्यांच्या भूमिकेचे लोकांतून स्वागत होत आहे. पालिकेचे अधिकारीही त्यामुळे धास्तावले आहेत. पालिकेतील अन्य सदस्य त्याकडे कसे पाहतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे.

नगराध्यक्षा शिंदे यांनी यापूर्वी चार ते पाच कामांना थेट भेटीही दिल्या आहेत. त्या कामांचा दर्जा फारच खराब असल्याचे त्यांना जाणवलेही आहे. त्याबाबत त्यांनी योग्य त्या हालचाली केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी रखडलेल्या कामावर लक्ष ठेवल्याचेही जाणवून गेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जाहीर केलेल्या ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ उपक्रमाची उत्सुकता लागून आहे.

अनेक छोट्या समस्यांकडे पालिकेच्या प्रशासकीय पातळीवरून दुर्लक्ष होत असेत. त्या नागरिकांशी थेट संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची दखल घेण्यात येईल. त्याचा निपटारा लवकरात लवकर करून लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न आपण ‘नगराध्यक्षा आपल्या दारी’ उपक्रमातून करणार आहोत.
- रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड