सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे हाल बेकार!

सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे हाल बेकार!

कऱ्हाड - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे तुल्यबळ आव्हान आहेच. त्याशिवाय भाजपने मुसंडी मागण्यास सुरवात केली आहे. अशा वातावरणात शिवसेनाला जिल्ह्यात संघटना बांधणीचे मोठे आव्हान आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे जिल्ह्याकडे झालेले दुर्लक्ष, जिल्हा पातळीवर नेत्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव व वाढत्या व्यक्तिनिष्ठतेमुळे शिवसेनेचे जिल्ह्यात हाल बेकार आहेत. 

येत्या २६ नोव्हेंबरला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची येथे जाहीर सभा होत आहे. त्यानिमित्ताने एकत्रीकरणातून ताकद दाखवण्याचे काम होईलही. मात्र, ते कितीकाळ टिकेल हाच खरा प्रश्न आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात क्षीण होणारी शिवसेना ग्रामीण भागात काही प्रमाणात दिसत असल्याचा अनुभव आहे. अशा स्थितीमध्ये पक्ष बांधणीसाठी जिल्ह्यातील शहरी भागावर लक्ष केंद्रित करून त्याची व्यापकता वाडीवस्त्यापर्यंत नेण्याची गरज आहे. 

शिवसेना म्हटलं, की लढवय्या पक्ष. अशी सर्वसाधारण पश्‍चिम महाराष्ट्रात त्याची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातही तो पक्ष आशाच तऱ्हेने वाढलाही. मात्र, अलीकडच्या काळात पक्षात आळेली मरगळ अत्यंत धोकादायक दिसते आहे. जे लोक विधानसभा निवडणुका पक्षाच्या माध्यमातून लढवतात. ते लोक पुन्हा पक्षबांधणीकडे दुर्लक्ष करताना दिसतात. स्थानिक पातळीवर पक्षाचे ‘धनुष्य’ सामान्य कार्यकर्ता उचलतोही, मात्र, जिल्ह्यासह वरिष्ठ पातळीवर एकदा होणाऱ्या राजकीय ‘सेटलमेंट’ त्या कार्यकर्त्यांच्या भावनांना ठेच पोचवणाऱ्या ठरतात. विधानसभा निवडणुकांत  आयात उमेदवारांना आणून निवडणुका लढवल्या जातात. त्यामुळे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते स्थानिक दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला आतून ‘सपोर्ट’ करताना दिसतात. ही स्थिती शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीवर परिणाम करणारी ठरल्याचे दिसते. जिल्ह्याच्या अनेक भागांत असे नेते आहेत, ज्यांचा शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर प्रभाव पडू शकतो. मात्र, त्यांनी संघटना वाढावी, म्हणून कधी प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे खच्चीकरण होताना दिसते आहे. चारच असतील; पण कट्टर असतील, अशी शिवसेनेची असलेली ओळख अनेक अर्थाने आता मागे पडताना दिसते आहे. त्यात शिवसेनेचे पीछेहाट शहरी भागात मोठ्या झपाट्याने होते आहे. पक्ष नव्हे विचार घेऊन आल्याचे नेते सांगत असताना त्यांच्यापासून लांब जाणारा शहरी भागातील त्यांचा कार्यकर्ता नक्की का असे करतो आहे, याचा विचार ज्येष्ठ पातळीवरील नेत्यांनी कधीच केलेला दिसत नाही. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक वाढीवर मर्यादा आल्याचे दिसतात.  

जिल्ह्यात पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, त्यांचे संघटन हे त्यांच्या नावावर चालणाऱ्या गटावर आहे. त्यामुळे त्यांचा संघटना बांधणीला पक्षाला फारसा उपयोग होताना दिसत नाही. त्यांना पक्षाने प्रवक्तेपद बहाल केले आहे. मात्र, संघटनात्मक वाढीसाठी कधी त्यांनी त्याचा कधीच विचार केल्याचे दिसत नाही. हीच अवस्था जिल्ह्यातील बहुतांशी पहिल्या फळीतील नेत्यांची आहे. दुसऱ्या फळीतीली कार्यकर्त्यांशी त्यांचा असलेला वाद व त्या वादातून त्या कार्यकर्त्यांना डावलले जाणे, या गोष्टी पक्षाला मारक ठरताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com