वहागाव तलावाच्या अस्तित्वाला धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

कवठे - येथील वहागाव पाझर तलावाची काही वर्षांपूर्वी तळभागापासून ते वरच्या सांडव्यापर्यंतची नव्याने दुरुस्ती करताना तलावीत झाडेझुडपे काढून, तलावाचे संपूर्ण पिचिंग करण्यात आले; परंतु हे काम करताना संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाकडे काळजीपूर्वक लक्ष न दिल्याने, तसेच कामाचा दर्जा चांगला न राखल्याने गळती कमी न होता ती वाढतीच राहिली आहे. आताही तलावामध्ये, तसेच बाजूला मोठी झाडे व झुडपे वाढल्याने या तलावाच्या अस्तित्वालाच आता धोका निर्माण झाला आहे.     

वाई तालुक्‍यातील कवठे व वहागाव या दोन गावांच्या हद्दीतील डोंगररांगेच्या बाजूला आवळीचीपड या शिवारात सन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळात रोजगार हमीतून या पाझर तलावाची बांधणी करण्यात आली. तलावाची पाणी साठवण क्षमता मोठी असल्यामुळे दोन्ही गावांतील बाजूंच्या विहिरींना त्याचा फार मोठा फायदा होतो. या भागातील शेतजमीन डोंगराच्या बाजूला असल्याने हलकी व खडकाळ आहे. त्यामुळे संपूर्णपणे विहीर बागायतीवर अवलंबून असणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्‍टर जमिनीला या तलावातील पाण्याचा फार मोठा फायदा होत आला आहे. गत दोन वर्षांत जलयुक्त शिवार योजनेतून जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाने, तसेच महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या कामासाठी तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर उपसल्याने साठवण क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. 

गेल्या काही वर्षांपासून पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने तलावात पुरेसा पाणीसाठा होत नव्हता. त्यामुळे या भागात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. मात्र, यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्याने डोंगर परिसरातील लहान- मोठे बंधारे, तसेच हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने व तुडुंब भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून मोठा आनंद, समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या तलावाच्या पाण्यावरच शेतकऱ्यांची पिकांची गणिते अवलंबून असतात. मात्र, घटत्या पाणी पातळीमुळे असल्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, पेरणी केलेल्या पिकांसाठी तरी तलावात पाणी उरेल काय? या काळजीत शेतकरी सापडला आहे. संबंधितांनी तलावातील गळतीकडे तत्काळ व गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तलाव कोरडा ठणठणीत पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. 

तलावाची सद्यःस्थिती
 तलावाच्या तळभागाला मोठी गळती 
 सांडव्याच्या भिंतीला तडे, भेगा 
 दररोज लाखो लिटर पाणी जाते वाहून 
 पाणीपातळी दररोज झपाट्याने होते कमी
 शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर होणार