कवठेमहांकाळला 14 गावांत 'एक गाव एक गणपती' उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

दुष्काळाच्या सावटात आगमनाची तयारी सुरू
ढालगाव - तालुक्‍यात साठ गावांपैकी चौदा गावांत एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात येत असून दुष्काळाच्या सावटातच गणरायाच्या आगमनाची तयारी मंडळांच्याकडून सुरू आहे. डॉल्बिमुक्‍त गणेशोत्सवासाठी पोलिसाकडून तीसवर गावांत बैठका घेत प्रबोधन केले आहे.

दुष्काळाच्या सावटात आगमनाची तयारी सुरू
ढालगाव - तालुक्‍यात साठ गावांपैकी चौदा गावांत एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात येत असून दुष्काळाच्या सावटातच गणरायाच्या आगमनाची तयारी मंडळांच्याकडून सुरू आहे. डॉल्बिमुक्‍त गणेशोत्सवासाठी पोलिसाकडून तीसवर गावांत बैठका घेत प्रबोधन केले आहे.

कवठेमहांकाळ तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट आहे. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. अशातच गणेश उत्सव येत आहे. अकरा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवासाठी गावात व काही वाडी वस्तीवर गणेशाच्या आगमणाची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात 179 मंडळे आहेत.

ढालगाव, अग्रणधुळगाव, घाटनांद्रे, देशिंग अशा 14 गावांत एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात येत आहे. डॉल्बिमुक्‍त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडून पोलिसप्रमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक यांनी गावात बैठका घेतल्या व प्रबोधन केले.

गत वर्षी पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सव शांततेत व सलोख्याने पार पडावा यासाठी एक गाव एक गणपती व डॉल्बीमुक्‍त गणेश मंडळ उपक्रम राबविला होता. त्यात ढालगाव येथील श्री बालगणेश मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. दुसरा क्रमांक अग्रणधुळगाव, तर तिसरा क्रमांक देशिंग गावाला देण्यात आला होतो. नुकताच त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ढालगावचे मंडळ हे गेली पंधरा वर्षे जातीय सलोखा राखून विधायक उपक्रम राबवित आहे. प्रत्येक वर्षाला मोठ्या महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

त्यादिवशी गावात कोणीही चूल पेटवत नाही. यावर्षी मंडळाच्या वतीने शाळेतील गरीब मुलांना गणवेशाचे वाटप केले आहे. दुष्काळ निधी, रक्‍तदान शिबिर जळीतग्रस्थांना मदत, गरिबांना मदत असे वेगवेगळे विधायक उपक्रम मंडळाकडून राबविले जात आहेत. मंडळाची सर्वांत मोठी मूर्ती असते. डॉल्बीमुक्‍त गणेश, पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणून काढली जाते. विशेष बाब म्हणजे मंडळाची विसर्जन मिरवणूक ही दुपारी निघते व सहाच्या आत विसर्जन करून परत येतात.