रिक्षाचालकाकडून महिलेचे ४० हजार रुपये परत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - रिक्षात विसरलेली पर्समधील ४० हजार रुपये रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे प्रवासी महिलेला परत केले. राजेंद्र वसंत शिंदे (वय ४७, मुक्त सैनिक वसाहत) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

कोल्हापूर - रिक्षात विसरलेली पर्समधील ४० हजार रुपये रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे प्रवासी महिलेला परत केले. राजेंद्र वसंत शिंदे (वय ४७, मुक्त सैनिक वसाहत) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

मुक्त सैनिक वसाहत येथे राजेंद्र शिंदे तीस वर्षांहून अधिक काळ रिक्षा चालवतात. काल सायंकाळी बी. टी. कॉलेज रिक्षा थांब्यावर सारिका सुहास मेहता (रा. गंगावेस) रिक्षात बसल्या. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात त्या घाईने उतरल्या आणि गडबडीत त्यांची कॅरीबॅग रिक्षात विसरली. त्यात दोन पर्स होत्या. त्यातील मोठ्या पर्समध्ये ४० हजारांची रक्कम होती. काही अंतरावर एका मेडिकलमध्ये त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रिक्षाचालकाचा शोध घेतला, मात्र शिंदे थेट घरी गेले होते. घरी पोचल्यावर मागच्या सिटवर त्यांना कॅरीबॅग दिसली. त्यात दोन पर्स होत्या. त्यातील मोठ्या पर्समध्ये ४० हजार रुपये होते. 

शिंदे यांना अखेरच्या दोन महिला प्रवाशांबाबत शंका आली. दुसऱ्या दिवशी बस थांब्यावर त्या येतील नाहीतर ती रोकड शाहूपुरी पोलिस ठाण्यात जमा करण्याचे त्यांनी ठरवले. रिक्षाचालक सापडत नाही म्हटल्यानंतर मेहता यांनी याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलिसात दिली. येथील पोलिस कर्मचारी संजय हेब्बाळकर, ओंकार परब आणि संग्राम पाटील यांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. मुख्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याआधारे रिक्षाचा क्रमांक शोधून काढला. सकाळी ते शिंदे यांच्या घरी गेले. त्याचवेळी शिंदे हे पैसे घेऊन पोलिस ठाण्याकडे जात होते. त्यांनी हे पैसे प्रवासी महिला मेहता यांना प्रामाणिकपणे परत केले. यापूर्वीही त्यांच्या रिक्षात शिवाजी पार्क येथील महिलेची विसरलेली पर्स त्यांनी त्यांनी प्रामाणिकपणे परत केली होती.