कोल्हापूरातील लक्ष्मीपुरीत ४४ गाळे सील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - लक्ष्मीपुरी क्‍लॉथ मार्केटजवळील गाळेधारकांचा असणारा तीव्र विरोध पोलिसांच्या मदतीने मोडून काढत अखेर महापालिकेने येथील ४४ गाळे सील करून ताब्यात घेतले. कारवाईच्या वेळी गाळेधारकांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

कोल्हापूर - लक्ष्मीपुरी क्‍लॉथ मार्केटजवळील गाळेधारकांचा असणारा तीव्र विरोध पोलिसांच्या मदतीने मोडून काढत अखेर महापालिकेने येथील ४४ गाळे सील करून ताब्यात घेतले. कारवाईच्या वेळी गाळेधारकांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यामुळे जादा पोलिस कुमक मागविण्यात आली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू ठेवण्यात आली.

अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजची कारवाई करण्यात आली. दरम्यान, महापौर स्वाती यवलुजे, आमदार राजेश क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन गाळेधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या दुपारी दीड वाजता महापालिकेत गाळेधारकांची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार येथे महापालिकेची साधारणपणे एक एकर जागा आहे. या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून येथील गाळे काढून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून येथील गाळे काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी गाळेधारकांना रीतसर नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटीसनुसार गाळे रिकामे करण्याची आज मुदत होती. मात्र, महापालिकेने काल या ठिकाणी कारवाईचा प्रयत्न केला. त्याला येथील गाळेधारकांनी तीव्र विरोध केला.

नोटीसची आज मुदत संपत असताना एक दिवस अगोदर का कारवाई करता, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. सर्व गाळेधारकांनी एकत्र येत कारवाईला विरोध केल्यामुळे काल महापालिकेला आपली कारवाई थांबवावी लागली होती.सकाळी अकरा वाजता महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक पोलिस फौजफाट्यासह लक्ष्मीपुरीत कारवाईच्या ठिकाणी आले. त्यांनी थेट गाळ्यांना सील करण्यास सुरुवात केली.

गाळेधारकांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गाळेधारकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाळेधारक अधिकच संतप्त झाले. यातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरण्यास सुरुवात केली. कर्मचारी आणि गाळेधारक यांच्यात वादावादी सुरू झाली. काही गाळेधारक अधिकच आक्रमक झाल्याने कर्मचाऱ्यांवर धाऊन जाण्याचा प्रयत्न काही जणांनी केला.

गाळेधारक आक्रमक झाल्यानंतर जादा पोलिस कुमक मागविण्यात आली. काही गाळेधारकांनी आपल्या गाळ्याची कुलूप लावण्याची शटरची पट्टीच मोडून टाकली होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पट्टी बसवून गाळे सील करावे लागले. एका गाळ्यामध्ये हॉटेल होते. हे हॉटेल फार जुने असल्याचे येथील लोकांमधून सांगण्यात येत होते. खाद्यपदार्थ तयार केले आहेत. त्यामुळे थोडा अवधी द्यावा, अशी विनंती हॉटेल चालक करत होता.

हॉटेल चालक व अधिकारी यांच्यात शाब्दिक खडाजंगी सुरू असतानाच या ठिकाणी महिला आल्या. त्यांनी हॉटेलच्या दारातच उभे राहून अधिकाऱ्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तणावाचे बनले. पोलिसांनी त्या महिलांना बाजूला केले. त्यानंतर गाळा ताब्यात घेण्यात आला. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख पंडित पोवार, इस्टेट विभागाचे प्रमुख प्रमोद बराले, परवाना विभागाचे सचिन जाधव आदी कारवाईत सहभागी झाले होते.

कारवाई संपत आली असताना कारवाईच्या ठिकाणी महापौर स्वाती यवलुजे, आमदार राजेश क्षीरसागर आले. त्यांच्या सोबत माजी महापौर आर. के. पोवार, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, अर्जुन माने, गणी आजरेकर आदी होते. आमदार क्षीरसागर यांनी अगोदर येथील गाळेधारकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. या वेळी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आयुक्‍तांशी चर्चा करावी, असे सांगितले. त्यामुळे आमदार क्षीरसागर यांनी आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर यासंदर्भात उद्या शुक्रवारी (ता. १६) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बैठक घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

पंचांना धमकी
गाळे सील करत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील दोन नागरिकांच्या पंच म्हणून सह्या घेतल्या. येथील गाळेधारकांनी त्यांचे मोबाईलवर फोटो काढून घेत दम भरला. कोल्हापुरात कुठेही राहत असा तुमच्या दारात येणार, अशी धमकी दिल्यामुळे या नागरिकांनी कागदपत्रावर सह्या करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी येथील सर्व गाळेधारकांना बाजूला हटविले.

गाळेधारकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न 
कोंबडी बाजार येथील गाळेधारकांवर केलेल्या कारवाईमुळे येथील गाळेधारकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.येथे उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाला विरोध नाही, पण त्यात अनेक त्रुटी आहेत. आमच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. बांधकाम कधी पूर्ण होणार? गाळेधारकांना गाळे कोठे मिळणार? याठिकाणी शंभर वर्षापूर्वीच्या असणाऱ्या झाडांचे काय करणार? याबाबत काही चर्चा झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्यास उशिर लागण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत आमचे व्यवसाय बंद राहणार असल्याने उपासमारीची वेळ येणार आहे. तरी महापालिकेने गाळेधारकांना न्याय द्यावा, असे पत्रक कोंबडी बाजार गाळेधारक सेवाभावी संघाचे अध्यक्ष ए. एम. मोमीन, उपाध्यक्ष व्ही. ए. पुजारी व सेक्रेटरी एम. बी. घाटगे यांनी दिले आहे.

Web Title: Kolhapur News 44 shops sealed in Laxmipuri