‘उदं गं आई उदं’च्या गजरात आंबील

‘उदं गं आई उदं’च्या गजरात आंबील

कोल्हापूर - 'उदं गं... आई उदं’च्या गजरात लाखो भाविकांनी ओढ्यावरील रेणुका (यल्लम्मा) देवीचे दर्शन घेतले. देवीला नैवेद्य देण्यासाठी दिवसभर रांगा लागल्या. नेटक्‍या नियोजनामुळे नैवेद्याच्या नासाडीला यंदा ब्रेक लागला. रेणुका देवस्थान समितीतर्फे रेणुका आंबील यात्रा उत्साहात झाली. 

मदन जाधव, किसन बेळगावकर यांच्या हस्ते आज पहाटे रेणुका, परशुराम व जमदग्नी ऋषींच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. रेणुकादेवीची पारंपरिक पद्धतीने पूजा बांधली. यानंतर भाजी-भाकरीचा नैवेद्य देवीला दाखविला. यानंतर देवीची आरती झाली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, सोमवार पेठेसह शहर व उपनगरातील भाविक दर्शनासाठी आले. शहर वाहतूक पोलिसांनी मंडलिक वसाहत, जयप्रभा स्टुडिओ, जवाहरनगर चौक, वाय. पी. पोवारनगर येथे बॅरिकेडस्‌ लावून वाहतूक रोखली. पार्किंगसाठी रस्त्याकडेला स्वतंत्र व्यवस्था करून तेथे वाहने उभी केली जात होती. मंदिर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा खेळणी, बांगड्या, सजावटीच्या आदी वस्तूंचे स्टॉल होते. खाद्यपदार्थांसह थंड पेयांचेही स्टॉल मोठ्या प्रमाणावर होते. दर्शनानंतर मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत बसून भक्तांनी भाजी-भाकरीसह आंबीलाचा आस्वाद घेतला. पाळणे, ब्रेक डान्सच्या खुर्च्यांवर बसण्याचा आनंदही उत्साही भाविकांनी घेतला. 

सायंकाळी चारच्या सुमारास मंदिरात पालखी सोहळा झाला. मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या. उपस्थित भाविकांनी ‘उदं गं आई उदंचा’ जयघोष करत पालखीचे दर्शन घेतले. याच दरम्यान न्यू पॅलेसमधून छत्रपतींकडील मानाचा नैवेद्य देवीला अर्पण केला. रात्री साडेनऊच्या सुमारास मदन जाधव, बायाक्काबाई चव्हाण (रविवार पेठ), लक्ष्मीबाई जाधव (गंगावेस) आणि पद्मा आळवेकर या जगांचे मिरवणुकीने प्रस्थान झाले.

भव्य मंडप बॅरिकेडस्‌ 
यात्रेसाठी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिरासमोर सुमारे शंभर फुटांचा भव्य मंडप उभा केला होता. त्यात बॅरिकेडस्‌ लावून महिलांची व पुरुषांची स्वतंत्र रांग केली होती. शिस्तबद्ध अशा पद्धतीने प्रत्येक भाविकांना मंदिरात सोडले जात होते. या मंडपातच बांधून आणलेले नैवेद्य काढण्यासाठी जागोजागी टेबल होते. त्याचा महिलांना चांगला उपयोग झाला. 

नैवेद्यासाठी स्वतंत्र व्यवस्था 
नैवेद्य स्वीकारण्यासाठी चार ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था होती. रांगेने स्वयंसेवकांकडून नैवेद्य स्वीकारले जात होते. एका ठिकाणी प्रसादाचे वाटप केले जात होते. मंदिरात जाणाऱ्या भाविकांकडून दारातच नैवेद्य स्वीकारून दर्शन करून बाहेर पडल्यानंतर त्यांना प्रसाद दिला जात होता. त्यामुळे कोणतीही घाई-गर्दी झाली नाही. त्यामुळे नैवेद्याची नासाडी टाळता आली. 

मोठा बंदोबस्त
दक्षतेचा भाग म्हणून मंदिर व परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मंदिरात आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एलईडी स्क्रीनद्वारे संपूर्ण यात्रेवर पोलिस नजर ठेवून होते. त्याचबरोबर बॉम्बशोधक आणि नाशक पथकही यात्रेच्या ठिकाणी गस्त घालत होते. त्याचबरोबर जीवनज्योती सेवा संस्थेचे १५ जवान, रेणुका भक्त मंडळाचे अरुण बारामते, प्रसाद  उगवे, विजय पाटील, सुनील मेढे आदींची पोलिसांना मदत मिळत होती.

आंबील, सरबताचे वाटप 
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जागोजागी सरबत व आंबील वाटप केले जात होते. माईकवरून याचा लाभ घ्या, असे आवाहन केले जात होते. महालक्ष्मीनगर येथील रेणुकाभक्तांनी महाप्रसादाचेही वाटप केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com