कळंबा फिल्टर हाउसची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

कोल्हापूर - शिवसेना गटनेते नियाज खान यांनी कळंबा फिल्टर हाउसवर आज हल्लाबोल केला. काचांची तोडफोड करून सुमारे तासभर फिल्टर हाउस बंद पाडले. अचानक झालेल्या घटनेमुळे फिल्टर हाउस कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

कोल्हापूर - शिवसेना गटनेते नियाज खान यांनी कळंबा फिल्टर हाउसवर आज हल्लाबोल केला. काचांची तोडफोड करून सुमारे तासभर फिल्टर हाउस बंद पाडले. अचानक झालेल्या घटनेमुळे फिल्टर हाउस कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वाय. पी. पोवारनगर, जवाहरनगर परिसरात काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही यासंबंधी आक्रमकतेने प्रश्‍न विचारले गेले. अपुऱ्या पाण्यामुळे नगरसेवकांना लोकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. पंधरा दिवसांपूर्वी खान व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. प्रभारी जलअभिंयंत्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले, पण पाणीपुरवठ्याची ओरड कायम असल्याने खान व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी एकच्या सुमारास फिल्टर हाऊसकडे धाव घेतली. 

अचानक घोषणाबाजी करत फिल्टर हाऊसमध्ये ते घुसल्याने कर्मचारी भयभीत झाले. फिल्टर प्लॅन्ट बंद केल्याने सुमारे एक तास पाणी उपसा बंद झाला. आयसोलेशन शेंडापार्क, राजेंद्रनगर, जवाहरनगर, स्वातंत्र्यसैनिक वसाहतीस पुढील भागातील पुरवठा खंडित झाला. ठोस आश्‍वासन मिळाल्याशिवाय फिल्टर हाऊस सुरू न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. येथील कार्यकर्त्यांनी टेबल उचकटून टाकले. फिल्टरच्या मुख्य दरवाजाला कडी घालून खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. कर्मचाऱ्यांना बाहेर काढून फिल्टरला टाळे लावले. खान यांनी प्रभारी जलअभियंत्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. फोन बंद असल्याचे खान यांनी सांगितले.

...तर आयुक्तांच्या केबिनला घेराव 
 आठ महिन्यांपासून सुधाकरनगर, वाय. पी. पोवारनगर येथे पाणी येत नाही. निवेदन दिले, आंदोलनं केली, पण अधिकाऱ्यांना जाग येत नाही. सोमवारी प्रश्‍न निकाल काढण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. नंतरही सुधारणा न झाल्यास आयुक्तांच्या केबिनला घेराओचा इशारा खान यांनी दिला.

Web Title: Kolhapur News agitation on Kalamba Filter house