अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नियुक्ती करा - डॉ. भारत पाटणकर

शिवाजी यादव
रविवार, 21 जानेवारी 2018

कोल्हापूर - "पंढरपुरच्या मंदिरात पगारी पुजारी नियुक्त झाले त्याच धर्तीवर कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्त करावेत. त्यासाठी सरकारने वेळ घालवू नये, '' अशी मागणी श्रमीक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केली. 

कोल्हापूर - "पंढरपुरच्या मंदिरात पगारी पुजारी नियुक्त झाले त्याच धर्तीवर कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्त करावेत. त्यासाठी सरकारने वेळ घालवू नये, न्यायालयाच्या निकालास अनुसरूनच गणमाता मंदिरातील पगारी पुजारी नियुक्ती व्हाव्यात. त्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा करावा.'' अशी मागणी श्रमीक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केली. 

अंबाबाईच्या मंदिरात डॉ. पाटणकर यांनी प्रवेश करण्यावरून सुरू झालेला वादविवाद तसेच त्यांच्याकडून आक्षेपार्य वक्तव्य झाल्यास गुन्हा दाखल करण्याची हिंदूत्वादी संघटनांनी केलेली मागणी या पार्श्‍वभूमीवर आज डॉ. पाटणकर यांची नियोजीत बैठक होणार की नाही या विषयी सुरवातीला संभ्रम होता. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला. बारा वाजता सुरू होणारी बैठक दुपारी दीडच्या सुमारास सुरू झाली. 

डॉ. पाटणकर म्हणाले की, "पूर्वापार रूढी परंपरा येथे आहेत. गेल्या शंभर वर्षात रूढी परंपराना धक्का कधी कधी पोहचला या बाबीही तपासाव्या लागतील. यातून देवतांवर हक्क सांगणारे कोण होते हेही उघड होईल. वास्तवीक तुळजाभवानीपासून अंबाबाईपर्यंतच्या देवता या गणमाता आहेत. आम्हाला आमच्या देवतांचे दर्शन घेण्यास कोणतीच अडचण नाही. आम्ही बहूजन हिंदूच आहोत. त्यामुळे आम्ही हिंदू नाही असेही म्हणण्याचे कारण नाही पण काहीजण मी हिंदू विरोधी विधान करत असल्याचे पोलिसांत जावून सांगतात. पोलिसांनी आजवरची माझी भाषणे तपासावीत. मी कधी ही हिंदू विरोधी बोललेलो नाही. असे असताना माझी बदनामी केली जावू नये अशी अपेक्षा आहे.'' 

पंढरपूरची विठ्ठल रूक्‍मीणी बहुजणांची देवता आहे. संत साहित्यातूनही ते स्पष्ट होते. पंढरपुर मंदिरात हकदार सेवकरी जावून तेथे पगारी पुजारी नियुक्त झाले. त्यासाठी न्यायिक संघर्ष करावा लागला. तिथे पगारी पूजारी नियुक्त केल्यानंतर उत्पन्नात वाढ झाली. भाविकांना कमी वेळात दर्शन मिळू लागले. त्याच धर्तीवर बहुजणांच्या गणमाता असलेल्या अंबाबाईच्या मंदिरातही पगारी पूजारी नियुक्त व्हावेत. त्यासाठी न्यायालयाने पंढरपुरातील विठ्ठलमंदिराबाबत जो आदेश दिला आहे, त्याचाच आधार घेऊन सरकारने वेळ न घालवता येथेही पगारी पूजारी नियुक्त करावेत

- डाॅ. भारत पाटणकर 

आम्ही कोणाही जाती घटकाच्या विरोधात आंदोलन करीत नाही. आमच्या मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी अन्यथा त्या संदर्भात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू त्यांची पोलिसांना माहिती देऊनच आंदोलन करू असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले. 

डॉ. पाटणकर यांनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्त करण्याची केलेली मागणीस आमचा पाठींबा आहे. त्यासाठीच्या आंदोलनातही संभाजी ब्रिगेड पाटणकरांच्या पाठीशी राहील.

-  सौरभ खेडकर

यावेळी डॉ. सुभाष देसाई , प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयश्री चव्हाण, मारूती पाटील, संपत देसाई आदी उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Bharat Patankar Press