बिद्री कारखाना निवडणूकीत भाजप-राष्ट्रवादी एकत्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - बिद्रीच्या निवडणुकीचा बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजला असून आज (शनिवारी) राष्ट्रवादी, भाजप आणि स्थानिक कॉंग्रेस यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन पॅनेल तयार केले आहे. कारखान्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

बिद्रीची निवडणूक जाहीर झालेपासून भाजप नेमके कोणाबरोबर जाणार याविषयी रोज चर्चा होत होत्या. पण आज शासकीय विश्रामगृह येथे आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार के. पी. पाटील, बजरंग देसाई, ए. वाय. पाटील, भाजपचे बाबा देसाई, हिंदुराव शेळके, रणजीत पाटील आणि समरजीतसिंह घाटगे गटाचे प्रकाश पाटील यांनी सयुंक्तपणे बैठक घेऊन एकत्र लढण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.

यावेळी येत्या २५ सप्टेंबरला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे पॅनेलच्या उमेदवारांची घोषणा करणार असून जागा वाटपही त्याच वेळी जाहीर होईल अशी माहितीही आमदार मुश्रीफ यांनी यावेळी दिली. यामुळे बिद्रीच्या निवडणुकीची दिशा स्पष्ट झाली असून कारखान्याच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि स्थानिक कॉंग्रेस यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, संजयबाबा घाटगे, दिनकरराव जाधव, विजयसिंह मोरे, बी. एस. पाटील, के. जी. नांदेकर असे दोन पॅनेल समोरासमोर येणार आहेत.