विवेकाची वाटचाल विजयाकडेच - डॉ. हमीद दाभोलकर

विवेकाची वाटचाल विजयाकडेच - डॉ. हमीद दाभोलकर

कोल्हापूर - प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्यासारख्या चळवळीत नसणाऱ्या लेखकांकडून चळवळीवर लिखाण होते. विरोधी विचारांचे लोकही आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पर्यावरणपूरक गणपती, फटाकेमुक्त दिवाळी यासारख्या उपक्रमात सक्रिय झाले, ही विवेकाची वाटचाल विजयाकडेच होत असल्याचे मापदंड असल्याचे स्पष्ट मत आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.

प्रा. डॉ. शानेदिवाण लिखित ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अक्षर दालन आणि ‘अंनिस’च्या वतीने शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी डॉ. राजन गवस होते.

विरोधी बोललात, तर तुमचे काही खरे नाही, अशा धमक्‍याच नव्हे, तर त्या व्यक्तीला संपवण्याची स्थिती असताना प्रा. डॉ. शानेदिवाण यांच्यासारख्या लेखकांनी लिहिते झाले पाहिजे, असे सांगून डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘‘केवळ माणसं मारली की विचार संपत नाहीत. उलट अशा घटनांमुळे चळवळ अधिक व्यापक होत जाते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद चळवळ समाजात रुजल्याचेच प्रतीक आहे. ‘फास्टर फेणे’ डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आवडायचा. कारण तो व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारतो. त्याचा ‘मागं फिरणं सोपं आहे, मात्र पुढे जाणं आवश्‍यकच आहे’ हा डायलॉग आम्हालाही प्रेरणादायी आहे.’’

प्रा. डॉ. राजन गवस म्हणाले, ‘‘आवाज दाबण्याचे सर्व प्रकार आता खुले आहेत. आपली पोरं घराबाहेर पडल्यानंतर नेमकी काय करतात, एवढे जरी तपासून त्यावर नियंत्रण आणले तरी परिवर्तनवादी चळवळीला बळ मिळेल.’’ प्रा. डॉ. शानेदिवाण यांनी यशवंतराव चव्हाण आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा प्रभाव आयुष्यावर राहिल्यानेच पुस्तकाचा विचार पुढे आला आणि अक्षर दालन संस्थेच्या मदतीने तो पूर्णही केल्याचे सांगितले. प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकावर समीक्षात्मक विवेचन केले. कार्यक्रमाला माजी आमदार पी. एन. पाटील, अक्षर दालन संस्थेचे रवींद्रनाथ जोशी, ‘अंनिस’चे संघटक कृष्णात कोरे, रमेश वडणगेकर, नसीम मुल्ला उपस्थित होते.
राज्य शासनाचा निषेध

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एन. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात शासनाला यश आले नाही. त्याबद्दल शासनाचा डॉ. हमीद दाभोलकर, कृष्णात कोरे यांनी कार्यक्रमात निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com