‘टेक्‍सास’, ‘गौरी’, ‘बुलेट’ उद्या नटणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - टेक्‍सास...गौरी...बुलेट...पतंग...बावरी...ही नावे आहेत येथील म्हशींची आणि आता याच म्हशी शुक्रवारी (ता. २०) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नटणार आहेत. हालगी-घुमक्‍याच्या तालावर डौलदार रोड शो करणार आहेत. 

कोल्हापूर - टेक्‍सास...गौरी...बुलेट...पतंग...बावरी...ही नावे आहेत येथील म्हशींची आणि आता याच म्हशी शुक्रवारी (ता. २०) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नटणार आहेत. हालगी-घुमक्‍याच्या तालावर डौलदार रोड शो करणार आहेत. 

शिंगांना मोरपिस, पायात चांदी-सोन्याचा तोडा व कवड्यांच्या माळांनी त्यांचा हा न्यारा थाट पाहण्यासाठी कोल्हापूरकर गर्दी करणार आहेत. दरम्यान, सोहळ्यातून प्रेरणा घेऊन शहर परिसरातील गावातही अशा पद्धतीने सोहळे होतात. हौशी कोल्हापूरकर आणि त्यांचे म्हशीवरचे प्रेम हे एक अतूट समीकरणच. 

दिवाळी पाडव्याला म्हशींना सजविण्यासाठी येथील गवळी व्यावसायिकांत प्रत्येक वर्षी सकस ईर्षा असते. म्हशीच्या केशरचनेपासून ते तिच्या अंगावर दागिने घालण्यापर्यंत त्यांच्यात चढाओढ असते. आता तर या सोहळ्याला विविध सामाजिक प्रश्‍नांवर प्रबोधनाची किनारही लाभते आहे.\ सजण्याबरोबरच शहरातील एखाद्या प्रश्‍नांवर या म्हशी भाष्यही करणार आहेत. 

गुरुवारी (ता. १९) रात्रीपासून या सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ होईल. शनिवार पेठ गवळी गल्लीत शुक्रवारी (ता. २०) म्हशींचा रोड शो होईल आणि शनिवारी सागरमाळावरही याच म्हशी सागरदेवाचे पूजन करतील. येथे म्हशींना दोन पायांवर उभे करण्याचे आणि तीन हाकेत बोलावण्याचे गवळी व्यावसायिकांचे कौशल्यही सर्वांना अनुभवता येईल. 

म्हशी ऑनलाईनही
सोशल मीडियाच्या काळात आता येथील म्हशींचे रोड शो नेटिझन्सनाही भुरळ घालत आहेत. गेल्या काही वर्षांत विविध वाहिन्या आणि व्हिडिओग्राफर्सनी केलेले व्हिडिओ ऑनलाईन उपलब्ध असून ते पाहून हा सोहळा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी आता अनेक ठिकाणांहून छायाचित्रकार येऊ लागले आहेत.