कोल्हापूरात सेनेला आव्हान भाजपचेच

कोल्हापूरात सेनेला आव्हान भाजपचेच

कोल्हापूर - ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’ अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला नेहमीच भरघोस साथ दिली. दहापैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत. पक्षाचा झंझावात कायम राहण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. 

कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, राधानगरी-भुदरगड आणि पन्हाळा बावडा असे दमदार विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या हाती आहेत. मागील निवडणुकीत मोदी लाटेतही सहा आमदार कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला दिले. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना पावणेसहा लाखांवर मते ही केवळ शिवसेनेच्या कर्तृत्वामुळे मिळाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा आजही कायम असताना शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यातील दुफळी चिंतेचा विषय बनला.

जिल्हा परिषदेच्या निकालानंतर पक्षातच दोन गट पडले. आमदार चंद्रदीप नरके भाजपसोबत गेले; तर जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहणे पसंत केले. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेला उपाध्यक्षपदाची संधी दिली. नरके यांनी करवीर मतदारसंघाचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले. 

शहर आणि जिल्हा शिवसेनेचा सवतासुभा कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारा ठरत आहे. मतभेद संघटना वाढीतून निर्माण झालेले नाहीत. तर तू मोठा की मी, अशा व्यक्तिद्वेषातून निर्माण झाले. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासमोर अनेक वेळा वाद गेला. मात्र, संपर्कप्रमुख एकदा मुंबईला निघून गेले की, पुन्हा वाद कायम राहतो. 

राजकारणात दोन राजकीय पक्षात नसेल इतका टोकाचा वाद शहर आणि जिल्हा शिवसेनेत आहे. परस्परांना मागे खेचण्याची एकही संधी दोन्ही गट सोडत नाहीत. ग्रामीण भागाचा विचार करता शिरोळमध्ये आमदार उल्हास पाटील यांनी गड कायम राखला. कोणत्याही वादात न पडणारा आमदार म्हणून पाटील यांची ओळख आहे. हातकणंलगलेत आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा दबदबा कायम आहे. राधानगरी भुदरगडमध्ये प्रकाश आबिटकर यांना विरोधक प्रबळ असले तरी नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आबिटकर यांनी एकहाती किल्ला लढवून दबदबा दाखवून दिला. आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी शाहूवाडीत गटाची ताकद कायम ठेवली. करवीरमध्ये आमदार नरके यांनी शिवसेनेसोबत त्यांच्या गटाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. कोल्हापूर उत्तरमध्ये आक्रमक आमदार म्हणून राजेश क्षीरसागर यांची ओळख आहे. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाओ आंदोलनासह अन्य आंदोलनांत सातत्याने सहभाग असतो. 

जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे यांवी ग्रामीण भागात संघटनात्मक ताकदीवर भर दिला आहे. प्रा. मंडलिक यांनी कागलचा बालेकिल्ला राखला. जिल्ह्यात शिवसेनेला लोकांची साथ आहे, मात्र आमदार आणि पदाधिकाऱ्यांतील बेकीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराचा थोडक्‍यात घात होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दौऱ्यावर आले की, सर्वजण त्यांच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करतात. मात्र ठाकरे यांना प्रत्येकाची नाळ ठाऊक असल्याने विधानसभा २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणता निर्णय देतील याचा नेम नाही. भाजपचे मोठे आव्हान पक्षासमोर असताना पक्ष संघटना अधिक मजबुतीने वाढविण्यापेक्षा आमदार आणि पदाधिकारी स्वतःची संस्थाने राखण्यात मग्न आहेत.

उद्धव ठाकरे यांचा दौरा असा
शुक्रवारी (ता. २४) दुपारी तीन वाजता बेळगावहून आगमन, शिनोळी (ता. चंदगड) येथील कार्यक्रमास उपस्थिती, उचगाव येथे औद्योगिक कामगारांशी चर्चा, सायंकाळी कुडित्रे येथे शेतकरी मेळाव्यास उपस्थिती, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाददिवसानिमित्त शनिवार पेठेतील कार्यक्रमास आठ वाजता उपस्थिती. रात्री कोल्हापुरात मुक्काम, शनिवारी सकाळी हॉटेल उद्योजक, व्यापाऱ्यांशी चर्चा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com