कंझ्युमर्स स्टोअरचे झाले ‘हाय’पर मार्केट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

शिवाजी विद्यापीठ - एकाच छताखाली हजारो वस्तू, उलाढाल पावणेपाच कोटींवर
कोल्हापूर - शैक्षणिक साहित्यापासून अन्नधान्याची उपलब्धता करणारे शिवाजी विद्यापीठातील ‘शिवबझार’ कंझ्युमर स्टोअर नव्या रूपात उभारले गेले आहे. मुलींच्या वसतिगृहालगत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर कार्यरत स्टोअरला ‘हायपर’ मार्केट रूप प्राप्त झाले असून अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या सेवेत स्टोअर खुले झाले आहे. विशेष म्हणजे या स्टोअरने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्याची गतवर्षाची वार्षिक उलाढाल चार कोटी पंचाहत्तर लाख रुपये इतकी राहिली आहे. 

विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देनानुसार १९६७ ला कंझ्युमर्स स्टोअरची स्थापना झाली आहे. स्टोअरमध्ये जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री केली जाते. अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिंनीना लागणाऱ्या आवश्‍यक वस्तू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच उपलब्ध व्हाव्यात, हा त्यामागील उद्देश आहे. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्रे यांना लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा येथूनच केला जातो. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर अथवा महिन्याकाठीचा बाजार भरल्यास झालेल्या हिशेबाची रक्कम  वेतनातून वजा करण्याची सोय उपलब्ध आहे. टीव्ही, वॉशिंग मशीन यासारखी इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणेही येथून विक्री केली जातात. खरेदी-विक्रीचे सॉफ्टवेअर स्टोअरमध्ये उपलब्ध असून माफक दरात मालचा पुरवठा येथून केला जातो. तसेच स्टोअरतर्फे रिसर्च प्रोजेक्‍टकरिता निधीच्या स्वरूपात काही रक्कमही दिली जाते. पन्नास वर्षे वैविध्यपूर्ण वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या या स्टोअरने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. आणि याच वर्षात त्याचे रूपही पालटले आहे. दाटीवाटीने ठेवलेल्या वस्तूंमुळे हे स्टोअर आहे की गोदाम, असा प्रश्‍नही निर्माण व्हायचा. 

मात्र, आता हायपर मार्केटच्या थाटामाटात जीवनावश्‍यक, शैक्षणिक वस्तुंची मांडणी केली आहे. छत्री, बिस्किटे, काजू, बदाम, तांदूळ, कापड, कागद, पेनपासून विविध प्रकारच्या वस्तू येथे उपलब्ध केल्या आहेत. 
स्टोअरचे सरव्यवस्थापक अवधूत पाटील म्हणाले, ‘‘एम. कॉम.चे विद्यार्थी अभ्यासासाठी जे प्रकल्प हाती घेतात, त्यांना त्यासाठी सहकार्य केले जाते. हे स्टोअर जसा विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसाठी खुला आहे, तसा तो शहरवासीयांसाठीही आहे.’’

‘शिवबझार’चे लवकरच उद्‌घाटन 
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी या स्टोअरला ‘शिवबझार’ असे नाव दिले आहे. येत्या काही दिवसांत त्याचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. कंझ्युमर्सचे अध्यक्ष म्हणून पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. डी. राऊत कार्यरत आहेत.