निलंबित पोलिस उपअधीक्षकाच्या मुलीवर गुन्हा

निलंबित पोलिस उपअधीक्षकाच्या मुलीवर गुन्हा

कोल्हापूर - अल्पवयीन मुलास दत्तक म्हणून घेऊन घरकामासाठी ठेवले. त्याचा लैंगिक आणि मानसिक छळ केला. याबाबत तक्रार दिल्यानंतर तब्बल वीस दिवसांनी निलंबित पोलिस उपअधीक्षकाच्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला. यानंतर कुटुंबीय बेपत्ता झाल्यामुळे तिच्या वडिलांसह कुटुंबीयांच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांची तीन पथके रवाना झाली असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ताराबाई पार्क येथे राहणारे निलंबित पोलिस उपअधीक्षकांकडे घरकामासाठी असलेल्या अल्पवयीन मुलावर अत्याचार केले. त्याबाबतची तक्रार ‘चाइल्ड लाइन’ संस्थेकडे दिली होती. त्यांच्या समुपदेशकांनी बालकल्याण संकुलात ही तक्रार केली. १ फेब्रुवारीला तक्रार दाखल झाल्यानंतर तब्बल २० दिवसांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत बाल कल्याण संकुलातील अधिकारी अश्विनी अरुण गुजर यांनी फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार पोलिसांनी उपअधीक्षकाच्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल केला. त्यांच्या मुलीने पीडित मुलास जिन्यावरून ढकलून दिले. मारहाण करून हात आणि पायावर चटके दिले. त्याच्या गुप्तांगावरही चटके दिल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. चाइल्ड लाइनच्या समुपदेशकांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपअधीक्षकांच्या घरातून पीडित मुलाची सुटका केली. यानंतर त्याला बालकल्याण संकुलात दाखल केले. संबंधितांच्या कुटुंबाविरोधात तक्रार देणाऱ्या समुपदेशकास धमकावण्याचा प्रकारही घडला होता असे समजते. याबाबत समुपदेशक शिवाजी माळी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.

बालकल्याण संकुलातील अधिकाऱ्यांनी पीडित मुलाच्या वयाची पडताळणीसाठी सीपीआरमध्ये वैद्यकीय चाचणी केली असता, पीडित मुलगा १४ ते १६ वर्षे वयाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपअधीक्षकाच्या अल्पवयीन मुलीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल केला. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी आज शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह तीन पथके ठिकठिकाणी रवाना झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

कायद्याला दिली बगल..?
संबंधित मुलगा अल्पवयीन आहे. दत्तक पत्र न करता उपअधीक्षकांकडे सोडले कसे ? याचीही शहानिशा होणार आहे. त्याबाबत संबंधित वरिष्ठांकडून सूचनाही आल्याचे समजते. संशयित उपअधीक्षक असल्यामुळे पोलिसांकडूनही दबक्‍या आवाजातच बोलले जाते.

दत्तक पत्र नाहीच
दत्तक पत्र न करताच मुलाला घरी ठेवल्याचाही आरोप संबंधित उपअधीक्षकासह कुटुंबीयांवर होत आहे. याबाबतची शहानिशा करून संबंधित उपअधीक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ही गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्याच दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केल्याची चर्चाही आज पोलिस ठाण्यात होती.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com