कोल्हापूरात गस्तीच्या सायकली गंजू लागल्या

राजेश मोरे
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - पोलिसांच्या सायकली म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. वरिष्ठांचा आदेश आला तरच गस्तीसाठी या सायकली बाहेर काढल्या जातात. एरवी मात्र त्या पडून राहून त्यांना गंज चढू लागला आहे. 

कोल्हापूर - पोलिसांच्या सायकली म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. वरिष्ठांचा आदेश आला तरच गस्तीसाठी या सायकली बाहेर काढल्या जातात. एरवी मात्र त्या पडून राहून त्यांना गंज चढू लागला आहे. 

शहर परिसरात उन्हाळी सुटी सुरू झाल्यानंतर घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागते. बंद घरांवर चोरटे लक्ष ठेवून हात साफ करतात. काही वर्षांपासून या उन्हाळी सुटीच्या काळातच घरफोड्या करण्याचे प्रमाण वाढू लागले. वाढत्या घरफोड्या रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले. त्यासाठी पोलिसांची गस्त वाढविली; मात्र चोरट्यांच्या कारवाया रोखण्यात पोलिस अपयशी ठरू लागले.

रात्रीच्या वेळी मोटार आणि मोटारसायकलवरून पोलिस गस्त घालतात. त्यांच्या वाहनांचा आवाज होतो. त्या आवाजाने चोरटे सतर्क होतात. हे पोलिसांच्या निरीक्षणावरून पुढे आले. त्यावर उपाय म्हणून मुंबईत पोलिसांची सायकलवरून गस्त सुरू केली. त्याचे चांगले परिणामही पुढे आले. याचाच अभ्यास करून विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकारातून सायकल गस्त सुरू करण्याची संकल्पना पुढे आली.

यामागे घरफोड्यांवर, चोऱ्यांवर अंकुश ठेवण्याबरोबरच पोलिसांची शारीरिक तंदुरुस्ती राखणे हा प्रमुख उद्देश होता. या दोनच उद्देशाने जुलै २०१७ मध्ये शहर व परिसरातील पोलिस ठाण्यांना गस्तीसाठी सायकल घेण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार शहरासह सात ठाण्यांनी पाच सायकलींसह हद्दीत गस्त सुरू केली. अनोखा वाटणारा हा प्रयोग नव्याचे नऊ दिवसांप्रमाणे चालला. कालांतरानंतर तो थंडही पडते गेला. 

पोलिस ठाण्यातच या सायकली पडून आहेत. कधी वायरलेसवरून अगर वरिष्ठांनी आदेश दिला तर या सायकली पोलिस ठाण्याबाहेर काढण्यात येतात. शहरातील उपनगरातील सोडाच; पण शहरात कधी पोलिस सायकलीवरून गस्त घालताना दिसत नाहीत. वापराविना पडून राहिलेल्या सायकलींना गंज चढू लागला आहे. केवळ ठाण्याच्या डेडस्टॉकला दाखवलेल्या या सायकली सांभाळण्याचेच काम पोलिसांकडून सुरू आहे. सायकल गस्तीच्या माध्यमातून चोरट्यांवर अंकुश आणि पोलिसांच्या तंदुरुस्तीचा प्रमुख उद्देश मात्र मागे पडत आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर पोलिसांच्या सायकल गस्तीबाबत ठोस नियोजन केले जावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

सायकल गस्तीचा प्रयोग अतिशय परिणामकारक होतो. मुंबईत डिलाई रोडला आम्ही असा मोटारसायकलस्वारवरील गस्त प्रयोग केला होता. तो लहान गल्लीबोळात, अडचणीच्या ठिकाणी यशस्वी झाला. सायकल गस्त करताना एका पोलिसाकडे बंदूक, तर एकाकडे वॉकी-टॉकी देण्यात यावी. गस्त घालताना संशयास्पद काही आढळल्यास वॉकी-टॉकीवरून कंट्रोल रूमला कळवता येईल. शस्त्रधारी पोलिस संशयिताला थांबवून ठेवू शकेल. लहान गल्लीबोळात, अरुंद, अडचणीच्या ठिकाणी वरील सोयी दिल्यास सायकल गस्त परिणामकारक होईल.
- विजय कदम, सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त