"जिल्हा नियोजन'च्या निधीस कात्री नाही - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - राज्य शासनाने विकासकामांना तीस टक्के कात्री लावली, तरी जिल्हा नियोजन समितीच्या निधीस ही अट लागू नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

कोल्हापूर - राज्य शासनाने विकासकामांना तीस टक्के कात्री लावली, तरी जिल्हा नियोजन समितीच्या निधीस ही अट लागू नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी दुपारी चारच्या सुमारास भेट दिली. आमदार सुरेश हाळवणकर व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी "रस्त्यांसाठी निधी नसल्याने खूप अडचणी येत असून जिल्हा नियोजन समितीच्या निधीला ही अट लागू करू नये,' अशी मागणी केली.

रस्त्याच्या कामासाठी निधी वाढवून द्यावा. जिल्हा नियोजन समितीच्या निधीस तीस टक्‍यांची कात्री लावल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती आणखी वाईट होणार आहे. त्यावर खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अत्यावश्‍यक कामे होतात. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा पुरवण्यास नियोजन समितीचा निधी महत्त्वाचा ठरतो. विविध विभागांच्या नियोजित तरतुदीला तीस टक्‍क्‍यांची कात्री लावली, तरी नियोजन समितीच्या निधीसाठी ही अट शिथिल आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी इचलकरंजीसारख्या मॅंचेस्टरनगरीचा विचार करता, आणखी सूतगिरण्यांची गरज व्यक्त केली.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. आपली अंतिम मोहोर उमटली, की हा आराखडा राबविण्यास मदत होईल, असे सांगितले. येत्या हिवाळी अधिवेशनात बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, म्हाडा (पुणे) चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महापौर हसीना फरास, आमदार अमल महाडिक, बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नगरसेवक विजयसिंह खाडे आदी उपस्थित होते. 

न्यू मोरे कॉलनीत परिसरात दुपारपासून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, शहर पोलिस उपधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक गुजर यांच्यासह पोलिस कर्मचारी तैनात होते. 

"सावली'तर्फे मुख्यमंत्री निधीसाठी मदत 
मुख्यमंत्र्यांनी सावली केअर सेंटरची भेट देऊन पाहणी केली. या वेळी 56 कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा निधी मुख्यमंत्री निधीसाठी दिला. धनादेश सुपूर्द करण्यात आला. जयश्री कुऱ्हाडे, अमित मुजावर, किशोरी देशपांडे, गौरी देशपांडे, उज्ज्वला नारकर, दत्ता कांबळे, अमिना मुजावर उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Devendra Fhadanvis visit to Chandrakantdada Patil House