दौलत साखर कारखानाप्रश्‍नी जिल्हा बॅंकेवर 13 ला मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

चंदगड - दौलत साखर कारखान्याबाबत जिल्हा बॅंकेने स्वार्थी भुमिका घेतली आहे, असा आरोप करत याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 13) तालुक्‍यातील शेतकरी व कारखान्याचे सभासद बॅंकेच्या कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय चंदगड तालुका जनआंदोलन कृती समितीने घेतला. आज कारखाना साईटवर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 

चंदगड - दौलत साखर कारखान्याबाबत जिल्हा बॅंकेने स्वार्थी भुमिका घेतली आहे, असा आरोप करत याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 13) तालुक्‍यातील शेतकरी व कारखान्याचे सभासद बॅंकेच्या कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय चंदगड तालुका जनआंदोलन कृती समितीने घेतला. आज कारखाना साईटवर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 

तालुक्‍यातील कारखान्यांनी गत वर्षीच्या उसाचा अंतिम दर निश्‍चित करावा यासाठी कृती समितीने आंदोलन छेडले आहे. त्याअनुषंगाने न्यूट्रीयन्ट्‌स कंपनी संचलित दौलत कारखान्यावर बैठक झाली. कंपनीचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी कंपनीच्या एका कामगाराला काही वेळ खोलीत कोंडून घातले. कंपनीच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान हा कारखाना न्यूट्रीयन्ट्‌स कंपनीला चालवायला देण्याचा निर्णय सर्वस्वी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचा होता. सभासद, शेतकरी, जनतेला विश्‍वासात न घेता त्यांनी तो चालवायला दिल्याबद्दल बैठकीत संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. 

अॅड. संतोष मळवीकर म्हणाले, ""कारखाना कंपनीला देऊन जिल्हा बॅंकेचे थकीत येणे वसुल करण्यात आणि बॅंकेचा परवाना (लायसन्स) वाचवण्यात ते यशस्वी ठरले. परंतु या स्वार्थासाठी त्यांनी चंदगडच्या जनतेचा विश्‍वासघात केला जिल्ह्याचे नेते म्हणून श्री. मुश्रीफ यांनी कारखान्याच्या हितासाठी स्वतः लक्ष घालणे गरजेचे होते. परंतु त्यांनी केवळ स्वार्थ साधला हे स्पष्ट आहे. म्हणूनच त्यांना जाब विचारण्यासाठी मोर्चा काढावा लागत आहे.'' 

विष्णू गावडे म्हणाले, ""चंदगडची जनता एकदा खवळली तर तिचा प्रकोप काय असतो हे अनेकदा जिल्ह्याने बघितले आहे. श्री. मुश्रीफ यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नये.'' प्रभाकर खांडेकर, भरमाणा गावडे, प्रताप पाटील, कामगार संघटनेचे जे.जी. पाटील यांच्यासह शेतकरी, कामगार उपस्थित होते. 

कारखाना चालवायला देण्यासंदर्भात चंदगडच्या जनतेने श्री. मुश्रीफ यांना सर्वाधिकार दिले होते. त्यांनी तो न्यूट्रीयन्ट्‌सकडे देताना यापुढील काळात कारखान्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले होते. परंतु वर्षभरात फिरकूनही बघितले नाही. 
- संग्रामसिंह कुपेकर