ड्रेनेजलाईनला आता सोसेना भार..

युवराज पाटील
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

सव्वाशे किलोमीटर अंतराची लाईन कालबाह्य

कोल्हापूर - शहरातील ड्रेनेज लाईन तसेच चेंबरमधील गाळ काढण्याची यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकरणामुळे जुन्या ड्रेनेज लाईन कालबाह्य झाल्या असून त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूर्ण शहरासाठी जुनी १५० आणि नवी ७५ किलोमीटर अशी २२५ किलोमीटर अंतराची ड्रेनेज लाईन अस्तित्वात आहे.

सव्वाशे किलोमीटर अंतराची लाईन कालबाह्य

कोल्हापूर - शहरातील ड्रेनेज लाईन तसेच चेंबरमधील गाळ काढण्याची यंत्रणाच महापालिकेकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकरणामुळे जुन्या ड्रेनेज लाईन कालबाह्य झाल्या असून त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूर्ण शहरासाठी जुनी १५० आणि नवी ७५ किलोमीटर अशी २२५ किलोमीटर अंतराची ड्रेनेज लाईन अस्तित्वात आहे.

न्यू शाहूपूरी येथील नवयुग तरुण मंडळ याच कारणावरून गेल्या दोन वर्षापासून आवाज उठवत आहे. विसर्जन मिरवणुकीत महापालिका बुथवर या मंडळानेही नारळही स्वीकारलेला नाही. तत्कालीन प्रशासक व्दारकानाथ कपूर यांनी तीन लाख लोकसंख्या गृहीत धरून ड्रेनेज लाईनचा आराखडा तयार केला. सायपन पद्धतीने (ग्रॅव्हटी) सांडपाणी पुढे वाहून नेणारी व्यवस्था आहे. १९८० नंतर शहराचा विस्तार वाढत गेला. आज ४५ उपनगरांचा ताण ड्रेनेजलाईनवर आहे. आता शहराची लोकसंख्या सहा लाखांवर गेली आहे; मात्र ड्रेनेजलाईनची व्यवस्था जुनीच आहे.

स्टेशन रोडला हॉटेल व्यावसायिक तसेच व्यापारी संकुलाची संख्या वाढत गेल्याने त्यांचा भार ड्रेनेजलाईनवर पडतो. न्यू शाहूपुरी (सासने मैदान परिसर) उताराचा भाग असल्याने ड्रेनेजलाईन ब्लॉक झाली की पाणी थेट रस्त्यावर येते. सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ई वॉर्डमधून संगम चित्रमंदिरसह टाकाळा येथून ड्रेनेजलाईन येऊन मिळते.

यातील गाळ वर्षानुवर्षे काढलेला नाही. एखाद्याची तक्रार आली की तेवढ्या पुरते जेट मशीन लावून ड्रेनेजलाईनचा मार्ग मोकळा होतो मात्र गाळ काढला जात नाही. पुन्हा ड्रेनेज तुंबली की तात्पुरती उपाययोजना केली जाते. 

ई वॉर्डसह सी तसेच ए बी वॉर्डमध्येही अशीच स्थिती आहे. काळाच्या ओघात गृहप्रकल्प, अपार्टमेंटची संख्या वाढत गेली. तेथील ड्रेनेजचा ताण जुन्या ड्रेनेजलाईनवर पडत गेला. सी वॉर्डची ड्रेनेजलाईन जयंती नाला परिसरातून जाते. नंतर दुधाळी आणि सिद्धार्थनगरमधील ड्रेनेज लाईन पेरूच्या बागेतून ‘जयंती’च्या दिशेने जाते. सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत सांडपाणी वाहण्याचा वेग अधिक असतो. पूर्वी टॅंकर होते. त्यास मनाई असल्याने ही पद्धतही बंद झाली आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून ७५ किलोमीटर अंतराची ड्रेनेजलाईन उपनगरातून टाकली गेली. गल्ली बोळ अथवा कॉलनीतील ड्रेनेज कनेक्‍शन मुख्य लाईनला जोडणे अपेक्षित होते. पंरतु बहुतांशी ठिकाणी कनेक्‍शन लाईनला जोडली गेलेली नाहीत.   

स्वतंत्र यंत्रणा आवश्‍यक
आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ अपुरे आहे. ड्रेनेज लाईन आणि चेंबर मोकळे करण्याची पद्धत जुनीच आहे. शहराची वाढती लोकसंख्या, उपनगरांचा ताण पाहता गाळ काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा पूर्वीच आस्तित्वात येणे आवश्‍यक होते. मात्र दुर्लक्ष झाल्यान ड्रेनेज रस्त्यावर साचून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.