कौशल्यवाढीचा ११९ अभ्यासक्रमांचा फाॅर्म्युला  

कौशल्यवाढीचा ११९ अभ्यासक्रमांचा फाॅर्म्युला  

कोल्हापूर - कौशल्याधारित व कम्युनिटी महाविद्यालयांसह सॅटेलाईट सेंटरचा समावेश असलेला शिवाजी विद्यापीठाचा शैक्षणिक बृहत्‌ आराखडा अधिसभेत आज मंजूर करण्यात आला. कला शाखेसाठी चोवीस, वाणिज्य तीस व विज्ञान शाखेसाठी पंचावन्न, तर अभियांत्रिकी, विधी, शिक्षणशास्त्रासाठी दहा अभ्यासक्रमांचा समावेश आराखड्यात केला असून, प्रत्येक तालुक्‍यात प्रत्येकी एक महिला महाविद्यालय व लोककला महाविद्यालय स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्दू माध्यमातून विज्ञान शाखेचा अभ्यासक्रमही सुरू केला जाणार आहे. आराखड्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर महाविद्यालये व अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रस्ताव मागविणार आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा झाली. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची यंदा अंमलबजावणी झाली. या अंमलबजावणीनंतर विद्यापीठाची पहिली अधिसभा आज झाली. सुरवातीला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. त्यानंतर प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी बृहत्‌ आराखड्याचे सादरीकरण केले. त्यांनी प्रत्येक तालुक्‍यात महिला महाविद्यालय, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू करण्यासह कौशल्याधारित रोजगारनिर्मिती करण्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रमांचा आराखड्यात समावेश केल्याचे सांगितले. बी.ए., एम.ए.साठी क्रिएटिव्ह रायटिंग, एम. ए.साठी ॲनिमेशन, सिव्हिल स्टडी, बी.कॉम.साठी इन्शुरन्स, ऑनलाईन शॉपिंग, बी.एस्सी.साठी फूड प्रोसेसिंग अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. अभियांत्रिकी, विधी, शिक्षणशास्त्र शाखेसाठीसुद्धा अभ्यासक्रम आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सॅटेलाईट सेंटरद्वारे अवकाश संशोधनाची व्याप्ती कळावी, यासाठी सॅटेलाईट सेंटर स्थापन करण्याची तरतूदही आराखड्यात केली आहे. त्यानुसार महाबळेश्‍वर, जत, चंदगड, माण आदी ठिकाणी ती स्थापन केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. औषधनिर्मिती, सेरिकल्चर, कार्बन ट्रेडिंग, डिझाईन अँड गेमिंगसह ब्रेल लिपी अभ्यासक्रमसुद्धा सुरू केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिसभेनंतर पत्रकारांशी बोलताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘बृहत्‌ आराखडा हा शैक्षणिक दिशा दाखविणारा आहे. ग्रामीण, कष्टकरी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी पोषक आहे. विद्यापीठाचा नवा कायदा जागतिक संदर्भात बदल घडवून आणणारा असल्याने, त्यादृष्टीने अभ्यासक्रमांचा समावेश आराखड्यात केला आहे. स्पर्धेच्या मुख्य प्रवाहात विद्यार्थ्यांना उभे करण्याचा हेतू अभ्यासक्रमांचा समावेश करण्यामागे आहे. असे अभ्यासक्रम महानगरातील विद्यापीठांत आढळणार नाहीत.’’ 

अधिसभेस परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. अण्णासाहेब गुरव, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. भारती पाटील आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी  सूत्रसंचालन केले. 

मुलींना उच्च शिक्षणाची संधी
कऱ्हाडच्या महिला महाविद्यालयात ११६० विद्यार्थिनी शिकत आहेत. उंबरा ओलांडून शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मुलींचा ओढा आहे. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण त्यांच्याच तालुक्‍यात उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्‍यात महिला महाविद्यालय असणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच आराखड्यात प्रत्येक तालुक्‍यात महिला महाविद्यालयाची तरतूद केली आहे. 

शुगर टेक्‍नॉलॉजीवर अभ्यासक्रम
कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे महाविद्यालय प्रत्येक तालुक्‍यात स्थापन करण्यासाठीची तरतूद आराखड्यात केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे प्रमाण लक्षात घेता, शुगर टेक्‍नॉलॉजीशी संबंधित अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. खादी प्रॉडक्‍शन अँड डिझाईन या अभ्यासक्रमाचासुद्धा आराखड्यात समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com