आजरा, भुदरगड तालुक्यात हत्तीचा धुडगूस

आजरा, भुदरगड तालुक्यात हत्तीचा धुडगूस

आजरा -  गेले महिनाभर पेरणोली परिसरात धुमाकूळ घातलेल्या हत्तीने मसोली गावाकडे मोर्चा वळवला आहे. हत्तीने येथील शेतकऱ्यांच्या गवत गंज्या विस्कटल्या असून, भात फस्त करणे सुरू आहे. या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

हत्तीने शामराम आप्पा कांबळे, तुकाराम गणू गावडे, मसणू बाळकू कसलकर, जानू बाळू कांबळे यांच्या गवत गंज्या विस्कटल्या. खळ्यावरील भात विस्कटून टाकले. सलग दोन दिवस रात्री हत्ती त्यांच्या शेतात येत आहे. त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही. याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

फणसाचे झाड मोडले
हत्तीने शंकर कसलकर यांच्या कामत नावाच्या शेतातील फणसाचे झाड काल रात्री मोडून टाकले. तो मसोली गावाजवळ आला होता. त्याच्या चित्काराने ग्रामस्थ भयभीत झाल्याचे श्री. कसलकर यांनी सांगितले.

कडगाव : भुदरगड तालुक्‍यातील थड्याचीवाडी येथे हत्तीने रविवारी मध्यरात्री अशोक चौगले यांचे पाण्याचे दोनशे लिटरचे बॅरल फोडले व पिंटू चौगले यांच्या ५ गुंठे उसाचे नुकसान केले. हत्तीला बाळू चौगले यांनी पाहिले. त्यांनी गावातील लोकांना जागे केले. हत्तीला हुसकावून लावण्यासाठी गावकऱ्यांनी फटाके फोडले.

काल मध्यरात्री धनगरवाडा ते थड्याचीवाडी असा प्रवास करत हत्ती कुडतरवाडी, चांदमवाडी असे दहा ते पंधरा किलोमीटर पायपीट करत तांबाळे व चांदमवाडी जंगलात आज सकाळी विश्रांती घेऊन पुन्हा माघारी कोंडुशी गावाकडे वळला.
दरवर्षी हत्ती कुडतरवाडी-करंबळी, नांदोली, देवर्डे, कारिवडे या जंगल परिसरातून आजरा तालुक्‍यातील देवकांडगाव परिसरात जातो. ऊस, केळी, कोवळे बांबू असे खाद्य व पाण्यात डुंबण्यासाठी कोंडुशी धरण अशा आवश्‍यक बाबी असल्याने हत्ती आणखी काही दिवस भुदरगडमध्ये मुक्काम ठोकण्याची शक्‍यता आहे.

काल मध्यरात्री हत्तीने ज्या मार्गावरून प्रवास केला आहे, त्याच मार्गावर अनेक ठिकाणी ऊसतोड मजुरांच्या झोपड्या होत्या. तसेच बऱ्याच वेळा शेतकरी रात्रभर शेतात वास्तव्यास असतात, अशा सर्वच लोकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
वनविभागातर्फे वनपाल एस. बी. पाटील, श्री. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com