मानवाड परिसरात पिकांसाठी, पोटासाठी ‘रात्रीस खेळ चाले’

सुधाकर काशीद
सोमवार, 28 मे 2018

कोल्हापूर - हत्ती शेतीचे नुकसान करतो हे खरे आहे. पण जेवढे नुकसान झाले तेवढी नुकसानभरपाई मिळते, यावर शेतकऱ्यांचा विश्‍वास नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हत्तीने शिवारात प्रवेश करू नये, यासाठी शेतकऱ्यांची धडपड आहे आणि त्यातून हत्तीला या शिवारातून त्या शिवारात हुसकावणे सुरू आहे. हत्ती विरुद्ध माणूस असाच हा पाठलाग आहे. 

कोल्हापूर - हत्ती शेतीचे नुकसान करतो हे खरे आहे. पण जेवढे नुकसान झाले तेवढी नुकसानभरपाई मिळते, यावर शेतकऱ्यांचा विश्‍वास नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हत्तीने शिवारात प्रवेश करू नये, यासाठी शेतकऱ्यांची धडपड आहे आणि त्यातून हत्तीला या शिवारातून त्या शिवारात हुसकावणे सुरू आहे. हत्ती विरुद्ध माणूस असाच हा पाठलाग आहे. 

हत्ती त्याच्यादृष्टीने जगण्यासाठी, तर शेतकरी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी रात्र-रात्रभर शिवाराबाहेर धडपडतो आहे. दोघांचेही या क्षणी बरोबर आहे. पण या परिस्थितीत काही तरी मार्ग आवश्‍यक आहे आणि अर्थातच वन खात्यावरच ही पूर्ण जबाबदारी आहे. 

काल (ता. २६) रात्री नऊला हत्ती पडसाळी मार्गावर मानवाड पैकी भैरीचा धनगरवाडा या बाजूने जंगलातून बाहेर पडला. हत्ती तो हत्तीच. त्यामुळे गुपचूप येणे त्याच्या स्वभावातच नाही. तो धनगरवाड्याच्या बाजूने आला ते झाडाच्या फांद्या मोडतच. त्या आवाजाने लोकांना हत्ती बाहेर पडल्याची जाणीव झाली. 

कालच हत्तीने ढवणाचा धनगरवाडा येथे घातलेल्या धुमाकुळाची माहिती सकाळी परिसरात पसरली होती. तेथे हत्तीने केलेले नुकसान पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. आणि पुन्हा आज रात्री हत्ती बाहेर पडून कोणाच्या तरी शेतात जाणार, तेथेही नुकसान करणार म्हणून शेतकऱ्यांनी हत्तीला हुसकावणे सुरू केले. काहींनी फटाके उडविले. अर्थात, त्यामुळे हत्ती या शेतातून त्या शेतात असे करीत पडसाळीकडे जाणारा डांबरी रस्ता ओलांडून जांभळी नदीच्या काठावर असलेल्या शिवारात घुसला व तेथे उसावर ताव मारू लागला. मात्र, आता शेतकरी जागरूक झाले होते.

पाहता-पाहता इकडून-तिकडून बॅटऱ्यांचे झोत हत्तीवर पडू लागले. लोकांचा गलका वाढला. तरीही हत्ती काही वेळ पाठमोठ्या अवस्थेत मुख्य रस्त्यालगतच्या एका शेतात फारशी हालचाल न करता तसाच उभा राहिला. आणि लोकांना त्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात जसा जमेल तसा बंद केला. 
हत्तीच्या वावराची माहिती कळताच वन खात्याचे कर्मचारी जीपमधून गस्तीवर आले. त्यांनी हत्ती गेलेल्या दिशेने बॅटरीचे झोत टाकू नये, असे लोकांना सांगितले. गर्दीला पांगविले. पण, हत्तीच्या मागावर लोक राहिले. हत्ती विरुद्ध माणूस अशा पाठलागाचे चित्र रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिले.

कुत्री ठरतात मोठा आधार
हत्तीच्या वावराची कल्पना पहिल्यांदा या परिसरातील कुत्र्यांना येते. त्यांचे एक सुरात ओरडणे सुरू झाले, की हत्ती आल्याचा माग लागतो आणि बरोबर काही वेळात हत्ती त्या परिसरात कोठे ना कोठे येतो. हत्ती समोर आला, की कुत्र्यांचा आवाज बंद होतो. घाबरलेल्या कुत्र्यांचा आडोसा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होतो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुत्री हा मोठा आधार आहेत.

चित्‍कारण्याचा आवाज दूरपर्यंत
पडसाळी, मानवाड, पिसात्री (ता. पन्हाळा) परिसरात असलेला हा हत्ती पूर्ण वाढ झालेला आहे. चिखलात लोळलेला हा हत्ती दुरून पाहिला तर एखाद्या छोट्या टेकडीसारखा दिसतो. त्याला मोठे सुळे आहेत. त्याच्या चित्‍कारण्याचा आवाज दूरपर्यंत येतो.

Web Title: Kolhapur News Elephant in Panhala Taluka