पदोन्नतीसाठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा

पदोन्नतीसाठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा

कोल्हापूर - शासकीय नोकरीत सेवेत रुजू झाले की, वय वाढेल त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना आपोआप पदोन्नती मिळते. आपोआप मिळणाऱ्या पदोन्नतीला कात्री लावण्याचा विचार शासन पातळीवर सुरू आहे. पदोन्नतीसाठी आता स्पर्धा परीक्षेप्रमाणे कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी गट ब संवर्गासाठी हा निर्णय झाला आहे. ही पदे भरताना केवळ २० टक्के जागा या सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने भरल्या जातील, उरलेल्या ८० टक्के जागा कर्मचाऱ्यांची परीक्षा घेऊन भरण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांतून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत.

शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर पदोन्नती ही त्याच्या सेवाज्येष्ठतेनुसार आपोआप मिळते. पदोन्नतीवर जाणाऱ्या त्या पदासाठी ही व्यक्‍ती सक्षम आहे की नाही, ते पाहिले जात नाही. नियमानुसार ठरावीक वर्षे सेवेत झाली की, रिक्‍त असलेल्या जागेवर पदोन्नती मिळते. सुरुवातीला महिला व बाल कल्याण विभागातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जागेसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पदोन्नतीने ही पदे भरत असताना यातील २० टक्‍के जागा या ज्येष्ठतेनुसार भरण्यात येतील. राहिलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची परीक्षा घेऊन निवड करण्यात येईल. त्यामुळे हुशार व चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकर पदोन्नती मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मात्र या परीक्षेस बसण्यासाठी शासकीय सेवेत कमीत कमी सात वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे बाल विकास अधिकारी पदाची शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या गट क मधील कर्मचाऱ्यांना या परिक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल. ज्येष्ठतेनुसार वीस टक्‍के पदे भरताना त्यातील दहा टक्‍के पदे ग्रामविकासच्या अधिनस्त असणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून आणि दहा टक्‍के पदे महिला व बाल कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येतील.

बाल विकास प्रकल्प अधिकारी अशी होणार निवड
गट क मधील ग्रामविकास व जलंधारण विभागाअंतर्गत कृषी अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सहायक प्रशासनाधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, कार्यालय अधीक्षक, सांख्यिकी सहायक पर्यवेक्षिका या सवंर्गासह सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी त्याचप्रमाणे महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परीविक्षा अधिकारी, संरक्षण अधिकारी, कार्यालय अधीक्षक, विधी सल्लागार, समुपदेशक व मुख्य सेविका या संवर्गातून वर्ग दोनच्या बाल विकास प्रकल्प अधिकारीपदासाठी निवड होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com