वीस नोव्हेंबरला दिल्लीवर चाल... - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोवाड -  सरकारच्या शेतीक्षेत्राच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे देशभर कर्जमुक्ती यात्रा काढावी लागली. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी असल्याने जयसिंगपूरच्या ऊस परिषदेनंतर २० नोव्हेंबरला देशातील लाखो शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीवर चाल करून सरकारला जागे करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली

कुदनूर (ता. चंदगड) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन सरपंच शालन कांबळे होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, जालंदर पाटील उपस्थित होते. 
श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे मान्य केले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला. चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांवर असलेले ८ लाख कोटींचे कर्ज आता साडेचौदा कोटींवर गेले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि सात-बारा कोरा झाला नाही, तर लाल किल्ल्यावर भाषण करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.’’

जालंदर पाटील म्हणाले, ‘‘उसाचा बुडका हातात घेऊन महाराष्ट्रातील शेतकरी एकत्र झाल्याने कारखानदार जागे झाले आहेत. ऊसदराची मागणी केल्याशिवाय कारखानदार दर देणार नाहीत.’’ सभापती जगन्नाथ हुलजी, संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, शंकर आंबेवाडकर, राजू रेडेकर, सुखदेव शहापूरकर, विश्‍वनाथ पाटील, सुनील पाटील, सरपंच राजू पाटील, तुकाराम ओऊळकर उपस्थित होते. प्रा. दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. नवनीत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपक पाटील यांनी आभार मानले.

‘हेमरस’च्या शेती कार्यालयाला उद्या टाळे
चंदगडमधील हेमरस, युको केन व दौलत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे. या कारखान्यांकडून ३०० रुपयांचा दुसरा हप्ता घेण्यासाठी लवकरच आंदोलन करू. मंगळवारी कोवाड येथील हेमरसच्या शेती कार्यालयाला टाळे ठोकून त्याची सुरवात करणार असल्याने शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजेंद्र गड्यान्नावर यांनी केले.

Web Title: Kolhapur News farmers rally in Kudnur