तृतीयपंथीय,एचआयव्हीग्रस्तांना मोफत शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  देशात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना व एचआयव्हीग्रस्तांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत केला आहे. पहिल्या टप्प्यात ५० तृतीयपंथीयांच्या मोफत पदवी शिक्षणास सुरवात झाली.

कोल्हापूर -  देशात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना व एचआयव्हीग्रस्तांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत केला आहे. पहिल्या टप्प्यात ५० तृतीयपंथीयांच्या मोफत पदवी शिक्षणास सुरवात झाली. त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

प्राधिकरणामार्फत ‘मानवी तस्करी बळी व व्यावसायिक लैंगिक शोषणाचे बळी या विषयावर काम करत आहे. याच योजनेअंतर्गत तृतीयपंथी व एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम हाती घेतले. पहिल्या टप्प्यात ५० तृतीयपंथीयांना पदवी शिक्षण देण्याची तयारी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दर्शवली. त्यासाठी २९ जणांची नोंदणी झाली. १२ वीपेक्षा कमी शिक्षण असलेल्यांना प्रथम १०० गुणांची ऑनलाईन पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर बी.ए. पदवीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. तृतीयपंथीयांच्या वयाच्या दाखल्याची अडचण विधी सेवा प्राधिकरणाने प्रतीक्षापत्र सादर करून दूर केली आहे.

मुक्त विद्यापीठातर्फे कौशल्यावर आधारित संगणक, टेलरिंग, ब्युटीपार्लर, केटरींग सारखे कोर्ससही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जेणे करून हे घटक भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहतील असे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी सांगितले.

महावीर कॉलेजचे प्रा. डॉ. अरुण पाटील यांनी तृतीयपंथींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगितले. डॉ. वासंती रासम यांनी जिल्ह्यात सुमारे चार हजार तृतीयपंथी आहेत. त्यापैकी ३० तृतीयपंथी शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. ही कौतुकास्पद आहे असे सांगितले. मयूरी आळवेकरसह तृतीयपंथी उपस्थित होते.

नदाफ ब्रॅंन्ड ॲम्बेसिडर
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे काम जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचविण्यासाठी ‘मास्टर रेहान नदाफ’ या साडेपाच वर्षांच्या मुलाची ब्रॅंन्ड ॲम्बेसिडर म्हणून निवड केल्याची घोषणा सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी केली. त्यांने विधी सेवा प्राधिकरणाची चळवळीवर भाष्य करून उपस्थितांची दाद मिळवली.