सौंदत्तीच्या डोंगरावर रंगतो जुगाराचा फड

सुधाकर काशीद
बुधवार, 6 डिसेंबर 2017

कोल्हापूर - केवळ जुगार खेळण्यासाठी सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या हवश्‍या-नवश्‍या भाविकांना रोखायचे कसे? हा सौंदत्तीच्या निस्सीम भाविकांसमोरचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या यात्रेसाठी किमान लाखभर भाविक कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून जातात. मात्र त्यातील काही जण अगदी उघड सलग दोन रात्र, दोन दिवस जुगारात रंगलेले असतात.

कोल्हापूर - केवळ जुगार खेळण्यासाठी सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या हवश्‍या-नवश्‍या भाविकांना रोखायचे कसे? हा सौंदत्तीच्या निस्सीम भाविकांसमोरचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या यात्रेसाठी किमान लाखभर भाविक कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून जातात. मात्र त्यातील काही जण अगदी उघड सलग दोन रात्र, दोन दिवस जुगारात रंगलेले असतात.

अनेक जण जुगारात हरल्याने रिकाम्या खिशाने परततात. जुगारावरून वाद तर गंभीरच मुद्दा झाला आहे. सौंदत्तीवर खेळल्या गेलेल्या जुगारातील वादाचे पडसाद गेले दोन दिवस कोल्हापुरात उमटत आहेत. वारे वसाहत, सुभाषनगर परिसरात याच वादावरून तणावाची परिस्थिती आहे.

यंदा यात्रेत या हवश्‍या-नवश्‍यांनी जुगाराचा कहर केला. सौंदत्तीत उतरल्यापासून जुगाराचे शंभर ते दीडशे फड २४ तास रंगले. एकीकडे इतर भाविक धार्मिक विधीत गुंतलेले असताना हे हवशे-नवशे मात्र जुगारातच दंग राहिले. या जुगारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. अर्थात काही जण मालामाल झाले आणि बहुतेक जण अक्षरशः कफल्लक झाले. मद्यपान करणाऱ्यांनीही स्वतंत्र बैठक मांडली.

शुक्रवारी (ता. १) रात्री सौंदत्ती डोंगरावर जुगाराचा फड रंगला. त्या वेळी एकमेकाला उद्देशून कॉमेंट करण्यावरून वाद सुरू झाला. त्यात इतरही पडले व गोंधळ उडाला. गोंधळ करणारे इतके प्रक्षुब्ध होते की, त्यांच्याबरोबर एस.टी.तून आलेल्या महिला, मुले, इतर ज्येष्ठ नागरिक गांगरून गेले. हा वाद तेथे रात्रभर धुमसत राहिला. यात्रेहून परतल्यानंतर सोमवारी (ता. ४) पुन्हा या वादाला तोंड फुटले. एकमेकाच्या वसाहतीत दुचाकीवरून जाऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या सर्व परिस्थितीला सौंदत्ती यात्रेतला जुगार कारणीभूत ठरला.

सौंदत्ती देवीचे स्थान पवित्र आहे. तेथे धार्मिक विधी परंपरेनेच होतात. कोल्हापुरातील आम्ही लाखभर भाविक तेथे जातो. पण अलीकडे काही चुकीच्या प्रवृत्ती वाढत आहेत. वास्तविक यात्रेच्या ठिकाणी पवित्रता राखणे हे प्रत्येक भाविकाचे कर्तव्य आहे.
- विजयाताई कुराडे, 
अध्यक्ष, रेणुकाभक्त संघटना

चैन, विरंगुळ्यासाठीच यात्रेला
यात्रेसाठी येणाऱ्यात नको त्या प्रवृत्तीचे लोक वाढले आहेत. केवळ चैन किंवा विरंगुळा यासाठी अनेक जण येतात. सौंदत्तीत पोचल्या-पोचल्या जुगाराचा फड मांडतात. अक्षरशः कर्जे काढून ते यात्रेसाठी येतात. पैसे गमावतात. अनेक जण त्यांच्या कामावर रजा मिळाली नाही तर दांड्या मारून यात्रेला येतात व तीन दिवस चैन करतात.

 

Web Title: Kolhapur News Gambling on Soundatti Mountain