नेत्यांच्या संमतीने सोयीच्या आघाड्या

रमेश पाटील
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

म्हाकवे -  कागल तालुक्‍यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गावागावांत स्थानिक सोयीच्या आघाडी, युती झाल्या आहेत. गटनेत्यांनीही सत्तेत येण्यासाठी अशा चित्र-विचित्र आघाड्यांना संमती दिली आहे. गावागावांतील भाऊबंदकीचाही परिणाम या निवडणुकीत दिसणार आहे. गावागावांत सदस्यपदापेक्षा सरपंचपदाच्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात ईर्ष्या दिसत आहे.

सरपंचपदासाठी मंडलिक गटाने १२, मुश्रीफ गटाने १८, संजय घाटगे गटाने ११, तर म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे गटाने १५ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. फराकटेवाडी येथील सरपंचपदी मुश्रीफ गटाच्या शीतल रोहित फराकटे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर फराकटेवाडी २, हणबरवाडी ३, नंद्याळ ४, करड्याळ व ठाणेवाडी येथील प्रत्येकी एक सदस्य असे ११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तालुक्‍यात सरपंचपदासाठी ८४, तर सदस्यपदासाठी ५९२ जण रिंगणात आहेत.

व्हन्नाळीमध्ये माजी आमदार संजय घाटगे व समरजित घाटगे यांच्यामध्ये युती आहे. तर त्यांच्या विरोधात मुश्रीफ गटाने पॅनेल केले आहे. बाचणी, अवचितवाडी, रणदिवेवाडी येथे मुश्रीफ गटाच्या विरोधात सर्व गट एकत्र आले आहेत. बोरवडे येथे सरपंचपदासाठी मुश्रीफ गटाचे गणपतराव फराकटे हे स्वत: उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात बालाजी फराकटेंनी पॅनेल केले आहे. बामणी येथे विचित्र आघाड्या झाल्या असून, सदस्यसंख्या नऊ असणाऱ्या या गावात सरपंचपदासाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत.

हमिदवाडा येथे मंडलिक, मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी स्वतंत्र पॅनेल उभी केली आहेत. पिराचीवाडी येथे मुश्रीफ गटाविरोधात संजय घाटगे, मंडलिक गट लढत आहे, तर या ठिकाणी राजे गटाने स्वतंत्र पॅनेल केले आहे. ठाणेवाडी येथे चौरंगी लढत आहे.