भाऊबंधात रंगले सोशल ‘वॉर’ जाेरात

युवराज पाटील
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

शिरोली पुलाची - जिल्ह्यात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली असून, पारंपरिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरील प्रचाराने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. वेगवेगळे फोटो, लहान आकाराचे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकाराचे संदेश मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सोशल वॉर सुरू झाल्याचे चित्र आहे. 

शिरोली पुलाची - जिल्ह्यात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली असून, पारंपरिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरील प्रचाराने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. वेगवेगळे फोटो, लहान आकाराचे व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकाराचे संदेश मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सोशल वॉर सुरू झाल्याचे चित्र आहे. 

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणून समाजमाध्यमांचा वापर सर्वच उमेदवारांकडून यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत होणार आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणारी ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील मतदारापर्यंत संपर्क साधण्याचे आव्हान सरपंचपदाच्या उमेदवारासमोर आहे. गावातील स्थानिक आघाडी व उमेदवारांची माहिती पत्रके, जाहीरनामे, पदयात्रा असा पारंपरिक प्रचार सुरूच आहे.

याचबरोबर प्रचारात सोशल मीडियाचा पुरेपूर वापर उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. सत्ताधारी आघाडी केलेल्या विकासकामाचा व प्रस्तावित कामाचा तपशील व फोटो मीडियावर टाकत आहेत. तर विरोधी आघाडी झालेल्या कामातील त्रुटी, कामाची गुणवत्ता नसल्याचे फोटो, अपूर्ण कामाचे फोटो यासह न झालेल्या कामांचा तपशील मीडियावर टाकत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आपलीच बाजू बरोबर असल्याचे ठासून सांगण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर करीत आहेत. या पोस्ट गावातील प्रत्येकाच्या मोबाईलवर पोचाव्यात, यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक प्रयत्न करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागात जणू सोशल वॉर सुरू झाले आहे.

तरुण कार्यकर्त्यांवर जबाबदारी
सोशल मीडियावर पदयात्रा, सभासह उमेदवारांच्या सेल्फी पोस्ट टाकणे, विरोधकांकडून आलेल्या पोस्टना जशास तसे उत्तर तयार करणे, व्हॉटस्‌ ॲप ग्रुप, फेसबुक पेज अपडेट करणे, अशाप्रकारे सोशल मीडिया हाताळण्याची जबाबदारी तरुण कार्यकर्त्यांवर आहे. सळसळता उत्साह व नवी ऊर्जा घेऊन तरुणाई उमेदवारांच्या प्रचारात उतरली आहे.

सोशल फंडा
निवडणूक प्रचारात सोशल मीडियाचा खुबीने वापर होत आहे. व्हॉटस्‌ ॲप ग्रुप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, हाईक आदी मीडियाद्वारे प्रचारासाठी लागणारे वेगवेगळे डिझाइनही तयार करून मिळत आहेत. उमेदवारांचे फोटो, पक्ष व आघाडीतील नेत्यांचे फोटो, प्रभाग क्रमांक, चिन्ह आणि ‘मतदान आम्हालाच करा’ असे आवाहन असलेले इमेजेस, व्हिडिओ तयार करून, त्याद्वारे कमी वेळात अनेकापर्यंत पोहचण्याचा सोशल फंडा सुरू आहे.

Web Title: kolhapur news Grampanchayat Election