राधानगरी तालुक्यात वाड्यावस्त्यांवर वातावरण ‘टाईट’

सुधाकर काशीद
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  राधानगरी तालुक्‍यातली दुर्गमानवाडची देवी नवस, कौल आणि गाऱ्हाण्यांसाठी प्रसिद्ध. सर्वसामान्य भक्‍तांची या आडवाटेच्या देवीकडे रोज रीघ. पण, ग्रामपंचायतीपासून, पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक असो, राजकारणी मंडळींचा या देवीवर मोठा भरोसा. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाच काय, सांगली, सातारा आणि अगदी बेळगावपर्यंतच्या राजकारणी मंडळींचे पाय हमखास दुर्गमानवाडच्या मंदिरास लागलेले. पण, आता या देवीच्या गावचीच निवडणूक आहे.

कोल्हापूर -  राधानगरी तालुक्‍यातली दुर्गमानवाडची देवी नवस, कौल आणि गाऱ्हाण्यांसाठी प्रसिद्ध. सर्वसामान्य भक्‍तांची या आडवाटेच्या देवीकडे रोज रीघ. पण, ग्रामपंचायतीपासून, पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक असो, राजकारणी मंडळींचा या देवीवर मोठा भरोसा. त्यामुळे कोल्हापूर जिल्हाच काय, सांगली, सातारा आणि अगदी बेळगावपर्यंतच्या राजकारणी मंडळींचे पाय हमखास दुर्गमानवाडच्या मंदिरास लागलेले. पण, आता या देवीच्या गावचीच निवडणूक आहे.

आज या देवीच्या मंदिरात आणि लगतच्या गैबीच्या दर्ग्यात निवडणुकीच्या निमित्ताने अक्षरश: झुंबड उडाली. प्रचारफेरीची म्हणजे शक्‍तिप्रदर्शनाची सुरवातच दर्ग्यातून झाली आणि विठ्ठलाई देवीच्या मंदिराजवळ ती विसर्जित झाली. 

हा परिसर जिल्ह्याच्या पश्‍चिम टोकाचा. तसे दुसरे काही वेगळेपण या परिसरात नाही. पण, विठ्ठलाई मंदिरामुळे दुर्गमानवडचे नाव सर्वदूर झाले आहे. एक छोटे गाव; पण त्यातल्या गुरववाडी, संत पाटीलवाडी, नाना पाटीलवाडी, राणेवाडी व हरिजन वाडीत संपूर्ण निवडणूकमय वातावरण आहे. मंदिराचा सारा परिसर फलकांनी भरला आहे. जनता दल-काँग्रेसचे दुर्गामाता पॅनेल विरुद्ध विठ्ठलाई पॅनेल असे स्वरूप असले तरीही सर्व संदर्भ स्थानिक आहेत. राधानगरी तालुक्‍यात सोळांकूर, राशिवडे, राधानगरी, शिरगाव, पुंगाव, धामोड या राजकीयदृष्ट्या जागरूक गावांत जरूर चुरस शिगेला पोचली आहे. पण, दुर्गमानवाड, पडसाळी, मानबेट, कांबळवाडी अशा अगदी दुर्गम भागातही ग्रामपंचायत निवडणुकीची चांगलीच ‘हवा’ आहे. 

मानबेटमध्ये राई, कंदलगाव, चौकेवाडी, हरिजनवाडा, मांडकरवाडी ही छोटी गावे येतात. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सर्वपक्षीय असे इथल्या लढतीचे स्वरूप आहे. गीता कृष्णा आरबुणे विरुद्ध अश्‍विनी संभाजी गोरुले यांच्यात होणारी ही लढत आजवर या परिसरात रस्त्यावर डांबर का पडले नाही, येथे सरकारी दवाखान्यात औषधाची गोळीही का मिळत नाही, या प्रश्‍नांना जाऊन भिडणारी आहे. ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ हा शब्द ऐकायला चांगला वाटत असला, तरी त्यामुळे या परिसरातील भूमिपुत्रांचाच आवाज कसा दाबला गेलाय, याचे पावलोपावली दर्शन घडते. लोक येथे कसे राहत असतील आणि दर पाच वर्षांनी मतदान का करत असतील, असे सहज मनात येणारे प्रश्‍न इथे प्रत्येक गावात आहेत. 

या परिसरातील अनेकांना आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांची नावे माहीत नाहीत, ते कधी येथे आले हे माहीत नाही. जिल्हाधिकारी फार लांबचे, कधी आरोग्याधिकारी, शिक्षणाधिकारी, पुरवठा अधिकारी, फौजदार, हवालदारांचेही पाय या गावांना लागलेले नाहीत. 

देवीचे गुरव आमने-सामने
दुर्गमानवाडच्या सरपंचपदासाठी असलेले परस्परविरोधी उमेदवार देवीच्याच गुरव घराण्यापैकी आहेत. दोघांनीही उमेदवारी दाखल केली. त्यामुळे आता विठ्ठलाई देवी कोणत्या गुरव उमेदवाराला कौल देते, याकडे तालुक्‍याचे लक्ष आहे. जयराम बाबू गुरव व युवराज पांडुरंग गुरव या दोघांत लढत होत आहे. 

मानबेटला यंत्रणेचीच कसोटी 
राधानगरी तालुक्‍याचे शेवटचे टोक असलेल्या मानबेटची निवडणूक म्हणजे राजकीय पक्षाचीच नव्हे, तर प्रशासकीय यंत्रणेचीही कसोटी आहे. मानबेट शेवटचे गाव. तेथून दाजीपूर जंगलाची सुरुवात होते. वाहनांसाठीचा रस्ता मानबेटमध्ये संपतो आणि पुढे दाजीपूरपर्यंत पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो. ज्याला विकास करायचा आहे, निधी ओढून आणायची ताकद आहे किंवा छोटे एखादे काम केले तरी श्रेय घेण्याचे वेड आहे, त्याने मानबेटला एकदा येण्याची गरज आहे. ग्रामपंचायत निवडणूक हे एक या चर्चेचे निमित्त आहे.