आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रा सुरू

रमेश पाटील
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

म्हाकवे - कर्नाटक, महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आप्पाचीवाडी - कुर्ली (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथांच्या पाच दिवस चालणाऱ्या भोंब यात्रेला हजारो भाविकांच्या साक्षीने प्रारंभ झाला.

म्हाकवे - कर्नाटक, महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आप्पाचीवाडी - कुर्ली (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथांच्या पाच दिवस चालणाऱ्या भोंब यात्रेला हजारो भाविकांच्या साक्षीने प्रारंभ झाला.

‘चांगभलं’चा गजर, ढोलांच्या व कैताळाच्या निनादाने परिसर दुमदुमला होता. खारीक, खोबरे व भंडाऱ्याच्या उधळणीने मंदिर परिसराने पिवळा शालू परिधान केला होता. पालखीतील उत्सवमूर्तीच्या समोर आबदागिरी, घोडे, बकरी, चांदीच्या काठ्या, देवाचे मुखवटे, गादी यांच्यासह भाविकांनी खडकावरील मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केली. नाथांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानकऱ्यांच्या हस्ते कर बांधून प्रारंभ झाला.

वाड्यातील व भागूबाई मंदिरातील मानकऱ्यांनी कुर्लीहून आलेल्या नाथांच्या पालखीच्या गाठीभेटी घेऊन मानकऱ्यांना विडे दिले. वाड्यातील मंदिरातून वाडी-कुर्लीच्या पालखी व नाथांच्या सोहळ्याने खडकावरील मंदिराकडे प्रयाण केले. ‘श्री हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं’च्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय झाला होता. नाथांच्या सबिन्याने खडकावरील मंदिरास प्रदक्षिणा घातली. या सबिनाने मंदिरात प्रवेश केल्यानंतर श्री. हालसिद्धनाथांची पूजा बांधण्यात आली. नाथांच्या आरतीनंतर तलवार बकरा खेळण्याचा कार्यक्रम झाला.

भाकणूकच यात्रेचे वैशिष्ट्य
पाच दिवस चालणाऱ्या यात्रेचे नाथांची भाकणूक हेच वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे यात्राकाळात वाडी व कुर्ली या गावात मांसाहार वर्ज्य केला जातो. अनेक वर्षांपासून चालू असलेला अलिखित नियम आजही पाळला जातो. माहेरवाशिणी व परगावी असलेले सर्व ग्रामस्थ श्री हालसिद्धनाथांच्या यात्रेत उपस्थिती लावतात.

Web Title: Kolhapur news Halisdinath festival starts