परत गेलेले ११२ कोटी व्याजासह आणणारच - हसन मुश्रीफ 

परत गेलेले ११२ कोटी व्याजासह आणणारच - हसन मुश्रीफ 

कोल्हापूर - जिल्ह्यात अपात्र ठरल्यामुळे परत गेलेले ११२ कोटी रुपये नाबार्डकडून व्याजासह परत आणणारच तसेच २००९ च्या कर्जमाफीत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी या वर्षी जाहीर झालेल्या कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन फॉर्म त्वरित भरावेत, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. २००९ मध्ये झालेल्या कर्जमाफीतील ११२ कोटी रुपये २०१२ ला अपात्र ठरविले. ते परत देण्याबाबत उच्च न्यायालयाने नाबार्डला सूचना केली आहे, मात्र नाबार्डने आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. याचा आढावा व नवीन कर्जमाफीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘२००७-०८ च्या कर्जमाफीत कर्ज मंजुरीचा निकष नव्हता तरीही, नाबार्डने कर्जमाफीचा निकष लावून ११२ कोटी रुपये अपात्र ठरविले. त्यामुळे गाव पातळीवरील सेवा संस्था अडचणीत आल्या. नाबार्डच्या या निर्णयानंतर आम्ही उच्च न्यायालयात गेलो. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर नाबार्डाने ती न महिन्यात अपिल करणे अपेक्षित होते. पण सात महिन्यानंतर त्यांनी हरकत घेतली आहे. तसेच, संबंधितांना नोटिसाही दाखल केल्या आहेत. त्यामुळे, वारंवार ठराविक मोठे कर्जदार दाखवून बुध्दीभेद  करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या पंधरा दिवसात उच्च न्यायालयात याची तारीख आहे. यासाठी वरिष्ठ वकील दिले आहेत. वकिलांची फी जिल्हा बॅंक देईल, पण या सर्व कामासाठी लागणारे निधी सभासदांकडूनच काढावा लागणार आहे.’’

के. पी. पाटील म्हणाले, ‘‘अपात्र ठरलेली कर्जमाफी परत मिळविण्यास कोणताही अडथळा येणार नाही. काही संस्था सोडल्या तर बहुसंख्य संस्थांमध्ये मानव निर्मिती अडथळे तयार झाले आहेत. प्रत्येकाला कर्जमाफी मिळाली पाहिजे. यासाठी ऑनलाईन अर्ज त्वरित भरले पाहिजेत.’’ या वेळी संचालक बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, उदयानी साळुंखे, भय्या माने, युवराज पाटील उपस्थित होते. कार्यकारी संचालक प्रतापराव चव्हाण यांनी अपात्र कर्जमाफीबाबत माहिती देऊन आढावा घेतला. 

१०१ च्या नोटिसा रद्द करा 
अपात्र कर्जमाफीची रक्कम जाहीर केल्यानंतर संस्था अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे संस्थांना १०१ च्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. त्या तेवढ्या थांबवा असे एका संस्थेच्या सभासदाने आवाहन केले. यावर, हे काम आमचे नाही, सरकारचे आहे. त्यांनाच तुम्ही सांगा, असे मुश्रीफ यांनी सांगितले. 

अपात्र ठरलेले कर्जदार आणि कर्ज :
- ४४ हजार ६६९ शेतकऱ्यांचे ११२ कोटी ७७ लाखांचे कर्ज अपात्र ठरले
- १ रुपया ते ५० हजार रुपयांपर्यंतचे ३८ हजार ६८८ खातेदार. याची ३५ कोटी ६५ लाख ७८८ कर्ज अपात्र ठरले.  
- ५० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत कर्ज असणाऱ्या १ हजार ६४६ खातेदारांचे १० कोटी ६६ लाख रुपये अपात्र ठरले आहेत. 
असे ४० हजार ४३४ खातेदारांचे अपात्र ठरवलेली मुद्दल आणि त्यावरील ४६ कोटी ३२ लाख व्याज धरून ९२ कोटी ६४ लाख रुपये व्याजासह मिळावेत, अशी मागणी केली आहे.

कर्ज कमी, अटी जास्त  
शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सक्ती करू नका, असे सांगितले; पण या सरकारला कमीत कमी कर्जमाफी-जास्तीत जास्त अटी घालून द्यायची आहे. अजूनही आमची मागणी आहे, की ३० जून २०१७ पर्यंतची कर्जमाफी द्यावी, तसेच प्रामाणिक शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपये दिले पाहिजेत. केंद्राच्या अपात्र कर्जमाफीत जे शेतकरी ७५ हजार रुपयांपर्यंत आहेत, ज्यांचे व्याजासह कर्ज दीड लाखांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत. ज्यांचे कर्ज ८० हजार असेल तर त्यांनी ५ हजार रुपये जिल्हा बॅंकेकडे भरावेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

हत्तीवरून मिरवणूक काढू
भाजप किसान सभेचे अन्वर जमादार कर्जमाफीवरून राज्यापासून केंद्र सरकारपर्यंत निवेदन देत आहेत. त्याऐवजी त्यांनी नाबार्डला याचिका मागे घ्यायला लावावी. आम्ही त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे आव्हान मुश्रीफ यांनी दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com