‘अँटिबायोटिक’चा अतिरेक रुग्णांच्या मुळावर

‘अँटिबायोटिक’चा अतिरेक रुग्णांच्या मुळावर

कोल्हापूर - प्रतिजैविक (अँटिबायोटिक) औषधांचा बेताल वापर रुग्णांच्या मुळावर येत आहे. रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे अँटिबायोटिक औषधे आहेत. अँटिबायोटिक औषधांना अमृत समजले जाते. मात्र याबाबत वापराचे अज्ञान घातक ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते जगभरात अँटिबायोटिक वापराचे प्रमाण विकसनशील देशांत आठ पटीने वाढले. अतिरेक वापर व अयोग्य सेवनामुळे साथीच्या आजारात वाढ व नियंत्रण मिळविणे अवघड होत चालले असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. 

अँटिबायोटिक औषधाविषयी व सुयोग्य सेवनाविषयी भारतासारख्या विकसनशील देशात खूपच अज्ञान असल्याचे दिसून येते. स्वतःहून अँटिबायोटिक औषध सेवन करणे (सेल्फ मेडिकेशन) काही डॉक्‍टरांकडून, औषध विक्रेत्यांकडून अतिवापर होत असल्याचे वैद्यकीय व्यवसायातील अनुभवी आणि तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. अति वापरामुळे रुग्णांची प्रतिकार क्षमता कमी होत चालली आहे. रुग्ण दगावणे आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात अँटिबायोटिक वापराचे प्रमाण विकसनशील देशांत आठ पटीने वाढले. दरवर्षी पाच लाख क्षयरोगी वाढत आहेत. भारतात या विशेष मोहिमेसाठी सुपरस्टार अभिताभ बच्चन जनजागृती करत आहेत.

भारतासारख्या विकसनशील देशात केंद्र शासनाने नॅशनल फार्मास्युटिकल प्राईस ॲथॉरिटीने अँटिबायोटिक औषधांच्या किमती ४० ते ८० टक्‍क्‍यांनी कमी केल्याचे औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. रुग्णांना पूर्ण डोस घेता यावा, हा यामागे केंद्र शासनाचा हेतू होता; परंतु याची वस्तुस्थिती उलट आणि बिकट झाल्याची दिसून येते. आजही अनेक रुग्णांकडून दहा गोळ्यांचा डोस असला तरीही तीन-चार गोळ्याच घेतल्या जात असल्याचा अनुभव औषध विक्रेत्यांचा आहे. धावपळीच्या युगात रुग्णांकडून अँटिबायोटिक औषध देण्याची मागणी डॉक्‍टरांकडे केली जाते. 

रुग्णाला एक-दोन दिवसांत बरे व्हायचं आहे. त्यामुळे अँटिबायोटिक गोळ्यांच्या मागणी वाढत आहे. काही रुग्णांकडून तोंडी अँटिबायोटिक औषधांची मागणी औषध दुकानदारांकडे केली जाते. प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिक औषध देऊ नये, असा कायदा आहे. औषध विक्रेत्यांसाठी विविध कायदे करून ही काहीही विशेष फरक पडत नसल्याचे 
दिसून येते.

जनजागृती आवश्‍यक
संशोधकांच्या अंदाजानुसार अँटिबायोटिकचा बेसुमार वापर व अयोग्य सेवनामुळे अँटिबायोटिक प्रतिरोध करण्याची क्षमता संसर्गजन्य विषाणूमध्ये वाढली आहे. २०५० पर्यंत जवळजवळ एक कोटी लोकांना यामुळे जीव गमावण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्यासह पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम, सोशल मीडियातून याबाबत प्रबोधन आवश्‍यक असल्याचे जाणकार सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com