हुपरीत उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृतसाठी फिल्डिंग 

हुपरीत उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृतसाठी फिल्डिंग 

हुपरी - येथील पालिकेत आता उपनगराध्यक्ष तसेच दोन स्वीकृत नगरसेवकपद निवडीचे वेध लागले आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपमधून जयकुमार माळगे यांच्या नावाची चर्चा असून भाजप व ताराराणी आघाडीतर्फे स्वीकृत नगरसेवक पदासाठी मातब्बरांनी फिल्डींग लावली आहे. 

चंदेरी नगरीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने जोरदार यश मिळवले. नगराध्यक्षपदासह 18 पैकी सात ठिकाणी भाजप, ताराराणी आघाडी पाच, शिवसेना, मनसे व अपक्ष प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले. निवडणुकीनंतर ताराराणी आघाडीने विकासाचा मुद्दा उपस्थित करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ दोन अपक्षांनीही भाजपमध्ये थेट प्रवेश करीत सत्तेसोबत राहण्याच्या निर्णय घेतल्याने भाजप पूर्ण बहुमतात आला आहे. 

भाजपच्या सातपैकी चार नगरसेवक महिला आहेत. नगराध्यक्ष महिला असल्याने भाजप नेते उपनगराध्यक्षपदी महिलेला संधी देऊन महिला सन्मानाचा वेगळा संदेश देतात की पुरूष नगरसेवकाची निवड करतात याची उत्सुकता आहे. सद्यःस्थितीत उपनगराध्यक्षपदासाठी जयकुमार माळगे, रफिक मुल्ला व भरत लठ्ठे यांच्यात माळगे यांचे पारडे जड आहे. माळगे यांच्या रूपाने मागासवर्गीयविरोधी मुद्दा पुसून काढण्याची भाजपला संधी आहे. हुपरीची राजकीय परंपरा पाहता पक्ष आघाड्यांनी मागासवर्गीय समाजाला सत्तेत नेहमी समान वाटा दिलेला आहे. ही गोष्ट माळगे यांच्या जमेची आहे. भरत लठ्ठे यांच्याबाबत सामजिक समतोलाचा तर रफिक मुल्ला यांच्या बाबतीत नवखेपणाचा मुद्दा अडसर ठरण्याची शक्‍यता आहे. 

पक्षीय बलाबल पाहता भाजप-ताराराणी आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य येणार आहे. दोन्ही गटात इच्छुकांची संख्या अधिक आहे. भाजपकडून शहराध्यक्ष सुदर्शन खाडे, अण्णासाहेब शेंडुरे, सुभाषराव माळी, दिनकरराव ससे, सुनील कल्याणी, सुभाष कागले तर ताराराणी आघाडी कडून पुंडलिकराव वाईंगडे, अण्णासाहेब इंग्रोळे, प्रकाश जाधव आदींची चर्चा सुरू आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून इच्छुकांनी नेते मंडळीचे उंबरठे झिजवण्यास सुरूवात केली आहे. 

स्वीकृतपदी पत्रकार 
हुपरी नगरपालिकेसाठी कृती समितीने लोकलढा उभारला होता. पत्रकारांनी हा लढा यशस्वी केला. आमदार सुरेश हाळवणकर, उद्योगपती महावीर गाट यांनी नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास स्वीकृत सदस्यांच्या एका जागेवर पत्रकारांची वर्णी लावण्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आमदार हाळवणकर शब्द पाळणार का? याची चर्चा सुरू आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com