कोल्हापूर शहरात डी. बी. पथकाची पुनर्रचना झाली फेल...

राजेश मोरे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी डी. बी. पथकाची केलेली पुनर्रचना फेल ठरली. शहरात चोऱ्या, घरफोड्यांसह चेन स्नॅचिंगच्या प्रकारात वाढच झाली. तसेच मागील गुन्ह्यांचा तपासही ‘जैसे थे’ असाच आहे. 

कोल्हापूर - गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी डी. बी. पथकाची केलेली पुनर्रचना फेल ठरली. शहरात चोऱ्या, घरफोड्यांसह चेन स्नॅचिंगच्या प्रकारात वाढच झाली. तसेच मागील गुन्ह्यांचा तपासही ‘जैसे थे’ असाच आहे. 

शहरात वर्षभरापासून घरफोड्या, चोऱ्या, चेन स्नॅचिंग, अवैध धंद्यात वाढ झाली. गुन्हे रोखण्यात, त्याचा छडा लावण्यात डी.बी. पथकाला यश आले नाही. याचा विचार करून पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शहरातील सर्वच ठाण्यांतील डी.बी. पथकाची पुनर्रचना करण्याचे आदेश दिले. सर्वच ठाण्यांतील डी. बी. पथकात थोडाफार बदल करून डी.बी. पथकाची पुनर्रचना केली. यात शक्‍यतो अधिकारी कायम ठेवून फक्त कर्मचारी बदलले. हे चित्र सर्वच ठाण्यांत पाहावयास मिळाले. डी. बी. पथकांना चोऱ्या, घरफोड्यांसह अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी सोपविली. नवे चेहरे डी.बी.त आल्यानंतर गुन्ह्यांवर अंकुश ठेवला जाईल, अशी अपेक्षा होती.

महिन्याच्या सुरुवातीलाच शाहूपुरी ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अयोध्या टॉवर येथे सहा बंद फ्लॅट तर महाडिक कॉलनीतील दोन फ्लॅट चोरट्याने एकाच दिवशी फोडले. आलिशान हॉटेलमध्ये आलेल्या दोघा भामट्यांनी किमती घड्याळ खरेदीच्या बहाण्याने तब्बल १५ लाखांची घड्याळे लंपास केली. ते भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाले. पण त्यांना अद्याप पकडण्यात यश आले नाही. आर. के. नगर व प्रतिभानगरात एकाच दिवशी दोन महिलांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने मोटारसायकलस्वारांनी लंपास केले.

आपटेनगर रिंग रोडवर एकाच दिवशी पाच तर साळोखेनगरात एकाच गल्लीतील चार बंद बंगले फोडले. राजारामपुरीतील पाच दुकाने, रुईकर कॉलनीतील बंद बंगला, नागाळा पार्क येथील दोन बंद फ्लॅट फोडले. मार्कट यार्डसमोरील बॅंकेचे एटीएम फोडले. टाकाळा येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. मध्यवर्ती बसस्थानकातून व्यापाऱ्याची बॅग, महिलेच्या पर्समधील दागिने चोरट्यांनी लंपास केले. अशा अनेक चोरी, घरफोड्यांसह चेन स्नॅचिंगचे प्रकार याच महिन्यात घडले. ते रोखण्यात अगर छडा लावण्यात अद्याप डी.बी. पथकाला यश आले नाही. 

मटका, जुगार अड्ड्यावरील दोन-चार कारवाया पोलिस ठाण्याकडून झाल्या. त्याही डी.बी. पथकाची पुनर्रचनेच्या हालचाली सुरू असताना. त्यानंतर मात्र या कारवाया थंड पडल्या. खुद्द शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी गवत मंडई येथील व्हिडिओ पार्लरवर छापा टाकला. मात्र अशा प्रकारची एकही कारवाई नव्या डी.बी. पथकाकडून झालेली नाही. पाच बंगला येथील मोबाईल, कपडे दुकान, फायनान्स कंपनीतील चोरीचा, मुक्त सैनिक येथील एटीएम, नागाळा पार्कातील दिवसाच्या घरफोड्या यांचा छडा लावण्यात अद्याप डी.बी. पथकांना यश आले नाही.

अवैध धंदे मुक्त शहर करा...
महिनाभरात मटका-जुगार अड्ड्यावर कारवाईच झाली नाही. जणू शहरच मटका-जुगार अड्डेमुक्त झाले, असे चित्र आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याचा आढावा घेतला जावा. त्यात जर तथ्य असेल तर ‘अवैध धंदे मुक्त कोल्हापूर शहर’ अशी घोषणाही केली जावी, अशी मागणी शहरवासीयांतून केली जात आहे.