गुळाच्या उलाढालीचा घसरला गोडवा

शिवाजी यादव
बुधवार, 4 एप्रिल 2018

कोल्हापूर - देशभरात लौकीक मिळविलेल्या कोल्हापुरी गुळाचा हंगाम यंदा अवघ्या २२२ कोटींच्या उलाढालीवर अखेरच्या टप्प्यात आहे. मागील ५ वर्षांच्या तुलनेत यंदा ७० ते ८० लाखांची उलाढाल कमी झाली. ही बाब कोल्हापुरी गुळाच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण करणारी आहे.

कोल्हापूर - देशभरात लौकीक मिळविलेल्या कोल्हापुरी गुळाचा हंगाम यंदा अवघ्या २२२ कोटींच्या उलाढालीवर अखेरच्या टप्प्यात आहे. मागील ५ वर्षांच्या तुलनेत यंदा ७० ते ८० लाखांची उलाढाल कमी झाली. ही बाब कोल्हापुरी गुळाच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण करणारी आहे.

अपवाद वगळता सलग दुसऱ्यावर्षीही गुळाला चांगला भाव मिळूनही उत्पादन घटले. परिणामी बाजारपेठेतील उलाढाल कमी झाल्याने कोल्हापूरच्या अर्थकरणाला बळ देणारा उद्योग डबघाईला येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाच वर्षांपूर्वी एका हंगामात जवळपास ३५ लाख गूळ रव्यांची खरेदी-विक्री होत होती. जवळपास २७५ ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल होत होती. यंदा गतवर्षीच्या तुलनेत आवक काहीशी वाढली, पण उलाढाल कमी राहिली.

कोल्हापूरच्या पाच नद्यांच्या काठावर गाळाची जमीन सुपीक आहे, या जमिनीत वाढलेल्या उसाचा गोडवा चांगला आहे. तो नैसर्गिक गोडवा गुळातही उतरतो. परिणामी कोल्हापुरी गुळाला राष्ट्रीय पातळीवर नाव मिळाले. येथील बाजार पेठेतील गुळाचे भविष्य उज्ज्वल होईल, असे सांगण्यात येते, मात्र प्रत्यक्ष त्याचा फारसा लाभ झाला नसल्याचे चित्र आहे.

दहा वर्षांपूर्वी गुऱ्हाळघरांची संख्या बाराशे होती. या गुऱ्हाळांवर दरवर्षी दीड लाख कामगार बीड, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, बार्शी तसेच जिल्हा दुर्गम भागांतून येत होते. हंगामातील चार-पाच महिने गुऱ्हाळघरावर गूळ बनवायचा, बाजार पेठेत पाठवायचा एवढेच त्यांचे काम होते. ती मात्र औरंगाबादमध्ये पाच वर्षांत औद्योगिक विकास झाला, त्यामुळे गुऱ्हाळ कामगारांची मुले बहुतांशी नोकरीला गेली. परिणामी मोजकेच मनुष्यबळ असल्याने गुऱ्हाळघर चालविणे मुश्‍कील झाले.

अशातही काही मजुरांनी अनामत घेऊन काम न करणे असाही पायंडा पाडला, यातून  गुऱ्हाळघरमालकांनाही जेरीस यावे लागते. जे गुऱ्हाळ पाच महिने गूळनिर्मिती करीत होते, तेथे जेमतेम दोन-तीन महिने चालवून बंद करायचे, असा प्रकार यंदाही घडला. त्यामुळे एप्रिल महिन्यात बहुतांशी गुऱ्हाळघरे बंद होत आहेत. 

वास्तविक मनुष्यबळाची अडचण पाच वर्षांत जाणवत होती. याकाळात मराठवाड्यातून येणाऱ्या गुळव्यांकडून गूळ बनविण्याचे प्रशिक्षण इथल्या गुऱ्हाळघरचालकांच्या मुलांनी घेणे अपेक्षित होते. गावातील बेरोजगार तरुणांना घेऊन चार-पाच महिन्यांच्या हंगामात गूळनिर्मिती स्वतःच्या बळावर करता येणे शक्‍य होते, मात्र तसा प्रयत्न अपवादाने झाला. 
 
गुळाची आवक यंदा गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे. बाजारात भावही बरा लाभला आहे, पण गूळनिर्मिती आणखी वाढणे अपेक्षित आहे. अजूनही हंगाम काही दिवस चालणार आहे.
- मोहन सालपे,
सचिव, बाजार समिती.   

 

Web Title: Kolhapur News Jaggery market issue