काजवा पाहायला आता महोत्सव!

काजवा पाहायला आता महोत्सव!

कोल्हापूर - रात्र जसजशी गडद होत जाईल, तसतसे गावालगतच्या झाडीझुडपांत लुकलुकणारे काजवे दृष्टीस पडत; पण ते आता खास काजवा महोत्सव भरवून दाखवण्याची वेळ आली आहे.

निसर्गाची ओळख म्हणून काजवा महोत्सव ठीक आहे; पण गावागावात पोहोचलेला प्रकाश, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे प्रखर झोत; यांमुळे सहज दिसणारे काजवे दिसेनासे झाले आहेत. त्यांना पाहायचे झाले, तर दाट झाडी असलेल्या ठिकाणी, किट्ट अंधारात आपल्याला जायची वेळ आली आहे. राधानगरीजवळ काळम्मावाडी धरणाच्या रस्त्यावर काजव्यांना पोषक वातावरण असल्याने तेथे काजवा दर्शनाची संधी मिळू शकणार आहे. 

19 ते 31 मेपर्यंत आयोजन
राधानगरीत बायसन नेचर क्‍लबने १९ ते ३१ मे या कालावधीत रोज रात्री आठ ते दहा या वेळेत काळम्मावाडी रस्त्यावर काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. अक्षरशः पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, सातारा येथून पर्यटकांनी आपली नावे नोंदवली आहेत. काजवा दाखवण्याचा हा महोत्सव पूर्ण मोफत आहे. राज्यभरातील लोक यावेत हीच त्यांची अपेक्षा आहे. 
 

इवलासा काजवा; पण अंधारात तो त्याची जादू दाखवतो. लुकलुकणारा प्रकाश देणाऱ्या या काजव्यांना निसर्गाने कसे घडवले असेल, हाच प्रश्‍न काजवा पाहताक्षणी बहुतेकांच्या मनात येतो. त्यामुळे काजवा हा नेहमीच आबालवृद्धांच्या कुतूहलाचा विषय असतो. काही वर्षांपूर्वी विजेचा फार मोठ्या प्रमाणात लखलखाट नव्हता. त्या वेळी गावापासून थोड्याशा अंतरावर काजव्यांचे लुकलुकणे पाहायला मिळायचे; पण आता विजेचा खूप लखलखाट झाला आहे.

क्षितिजाकडे बघितले तर पहाट झाली की काय, असे वाटण्यासारख्या प्रकाशाची एक मंद पट्टी नजरेला येते. शहरातल्या प्रकाशाचा तो परिणाम असतो. त्यामुळे अंधाराची तीव्रता कमी होते. अंधाराची तीव्रता कमी झाल्यानेच काजव्यांचे अस्तित्व पूर्ण क्षमतेने जाणवत नाही. दाट जंगल, डोंगर किंवा पुरेसा अंधार असलेल्या परिसरात त्यांचे अस्तित्व जाणवते. राधानगरी, काळम्मावाडी धरणाचा परिसर यासाठी अजूनही योग्य आहे. 

लुकलुकणारे काजवे हे वेगळेपण
राधानगरी ते काळम्मावाडी रस्त्यावर अजूनही काळाकुट्ट म्हटला जाणारा अंधार असतो. अर्थात त्यामुळेच तेथे दूरवर लुकलुकणारा काजवा दिसतो. काजवे थव्याने उडत येतात व एखाद्या झाडावर बसताच प्रकाश बाहेर सोडतात आणि ते अख्खे झाड उजळवून टाकतात. या झाडावरून त्या झाडावर उडणारे काजवे व त्यांचे समूहाने लुकलुकणे हेच निसर्गाचे वेगळेपण असते. 

काजवा दर्शन ही फक्त आमची पर्यटकांसाठी सेवा आहे. छोट्या काजव्यात किती वेगळेपण आहे, हे फक्त दाखवणार आहोत. ही सारी किमया निसर्गाची आहे. येणाऱ्या पर्यटकांना ठरावीक ठिकाणी घेऊन जाणार आहोत. फक्त त्या ठिकाणी मोबाईल किंवा नित्य वापरातील बॅटरीचा प्रकाश कोणी पाडणार नाही, याची खबरदारी घेणार आहोत. 
- सम्राट केरकर,
  बायसन नेचर क्‍लब, राधानगरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com