विचार संपविणाऱ्या मंडळींना रोखण्यासाठी एकत्र यावे- कन्हैयाकुमार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

देशात संघटितपणे दहशत माजविणाऱ्यांना रोखण्यासाठी आणि विचार संपविण्यासाठी निघालेल्या मंडळींना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे'', असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कोल्हापूर : ""माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणारे मूर्ख आहेत, ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडू न शकणारे सरकार देशाला महासत्ता बनविण्याची खोटी भाषा करते, देशात संघटितपणे दहशत माजविणाऱ्यांना रोखण्यासाठी आणि विचार संपविण्यासाठी निघालेल्या मंडळींना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे'', असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

कन्हैयाकुमार यांनी आज गोविंद पानसरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यापूर्वी जेथे पानसरेंवर गोळ्या झाडल्या, त्या ठिकाणी त्यांनी अभिवादन केले. उमा पानसरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलले.

कन्हैयाकुमार म्हणाले, ""समाजात पुरोगामी विचार मांडणाऱ्या पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्‍तींची दिवसा हत्या केली जाते आणि त्यातील मारेकरी सापडत नाहीत, हे सरकारचे अपयश आहे. त्यांचे मारेकरी शोधणे हे सरकारपुढे मोठे आव्हान आहे.विचारवंतांचा खून केलेले आरोपी सरकारला सापडत नाहीत. आरोपी उजळ माथ्याने मोकाट फिरतात. ते सरकारला सापडत नाहीत आणि हेच सरकार देश शक्‍तिशाली, महासत्ता बनविण्याची भाषा बोलत आहे. हे देशाला काय महासत्ता किंवा शक्‍तिशाली कसे बनविणार?

माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे. ती मूर्ख आहेत. कारण निसर्गाचा नियम आहे. जेवढे दाबाल तेवढे नंतर ते उफाळून येणार. माझा आवाज आणखी वर येईल. चांगले विचार मांडणाऱ्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. हेच डॉ. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येवरून दिसून येते. देशात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

भाकपचे राज्य सेक्रेटरी डॉ. भालचंद्र कानगो, मिलिंद रानडे, मुकुंद कदम, प्रा. सुनीता अमृतसागर, ऍड. मिलिंद कदम, राहुल घोटणे, रूपाली कदम, रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर,राहूल घोटणे,गिरीश फोंडे, "एआयएसएफ'चे राज्य सचिव पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.