एलईडी टीव्ही रंग उधळीत येई घरा..!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - पूर्वीचा टीव्ही म्हणजे, ब्लॅक/व्हाईट चित्र, मध्येच पट्टे येणे, मुंग्यांसारखे चित्र दिसणे अन्‌ साध्या खोक्‍यासारखा आकार. टीव्ही, ट्रान्झिस्टर, टेपरेकॉर्डर एखाद्याच्या घरी असणे म्हणजे तो श्रीमंत समजला जायचा. आज मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. स्टॅंडर्ड डेफिनेशन, हाय डेफिनेशन, अल्ट्रा हाय डेफिनेशन असे टीव्हीमध्ये स्थित्यंतर झाले आहे. 

कोल्हापूर - पूर्वीचा टीव्ही म्हणजे, ब्लॅक/व्हाईट चित्र, मध्येच पट्टे येणे, मुंग्यांसारखे चित्र दिसणे अन्‌ साध्या खोक्‍यासारखा आकार. टीव्ही, ट्रान्झिस्टर, टेपरेकॉर्डर एखाद्याच्या घरी असणे म्हणजे तो श्रीमंत समजला जायचा. आज मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. स्टॅंडर्ड डेफिनेशन, हाय डेफिनेशन, अल्ट्रा हाय डेफिनेशन असे टीव्हीमध्ये स्थित्यंतर झाले आहे. 

एखाद्या होम अप्लायन्सेसच्या शोरूममध्ये भिंतीवर लावलेले ३२ ते ६५ इंचांपर्यंतच्या आकाराचे टीव्ही विविध रंगीबेरंगी चित्रांची उधळण करत ग्राहकांना आकर्षित करताना पाहायला मिळतात. डिजिटल तंत्रज्ञानातील थक्क करणाऱ्या या आविष्काराने मात्र टीव्ही मार्केटचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या आसपास कोल्हापुरातील अनेक शोरूम्समध्ये जगभरातील नामांकित कंपन्यांचे टीव्ही उपलब्ध केले गेले आहेत. 

सोनी, एलजी, पॅनासोनिक, सॅमसंग, शार्प, व्हीयू, रिलायन्स रिकनेक्‍ट या ब्रॅंडस्‌भोवती विशेष गर्दी दिसते आहे. याबाबत रिलायन्स डिजिटलमधील रजनीश आंबेकर म्हणाले, ‘‘सोनी ब्रॅण्डकडे कोल्हापूरकरांचा अधिक कल दिसतो आहे. एलईडीमध्ये ३२ ते ६५ इंचांपर्यंत मॉडेल्स उपलब्ध असून, ३२ इंची मॉडेल हे १४ हजार ९०० तर ६५ इंची मॉडेल दोन लाख १९ हजार ९९०, ५५ इंची मॉडेल साडेतीन लाख रुपयांत मिळते.

क्‍यूएलईडीमध्ये साडेतीन ते साडेचार लाख, अगदी सात लाख रुपयांपर्यंतही मॉडेल्स मिळतात. विशेष म्हणजे कोल्हापुरातील १०० लोकांमध्ये दहा लोक अतिशय महाग मॉडेल्स खरेदी करताना दिसतात.’’ या महागड्या टीव्ही मॉडेल्सची महिन्याला पाच ते दहा इतकी विक्री होते.           

ॲनालॉग टेलिव्हिजन हे टेलिव्हिजन क्षेत्रातील पहिले तंत्रज्ञान. ॲनालॉग सिग्नल्सचा वापर करून व्हिडिओ, ऑडिओचे ट्रान्समिशन केले जाई. आज परिस्थिती अशी आहे, की तुम्ही एलईडी टीव्ही खरेदी करायचा. संबंधित शोरूम तुम्हाला होम डिलिव्हरीची सुविधा देते. भिंतीमध्ये हा टीव्ही काही मिनिटांत ‘माउंट’ केला जातो.

एका अंदाजानुसार, २०२३ पर्यंत जगभरातील हे टीव्ही माउंट मार्केट ३.३९ अब्जांपर्यंत पोहोचेल. विशेषत: आशिया पॅसिफिक, चीन, भारतात हे मार्केटमध्ये अतिवेगाने विस्तारते आहे. माउंटिंग म्हणजे टीव्हीचा सेट हा भिंतीवर किंवा छतावर थेट लावला जातो. भारतातील टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, चीन, अमेरिकेनंतर भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची टीव्हीची बाजारपेठ बनली आहे. घरगुती टीव्हीचे प्रमाण २०११ मध्ये ११९ दशलक्ष होते. २०१७ मध्ये हा आकडा १८३ दशलक्षांवर पोचला आहे. २०२० मध्ये तो २०० दशलक्षांवर जाईल.

टीव्ही खरेदीत वाढ 
पूर्वी सहजासहजी कर्ज मिळत नसे. आज विविध फायनान्स कंपन्यांद्वारे अक्षरश: दहाव्या मिनिटाला कर्ज मंजूर करून दिले जाते. आधार, पॅन कार्डद्वारे ग्राहकांचे क्रेडिट रेटिंग या कंपन्यांना समजत असल्यामुळे कर्ज मंजुरी तत्काळ केली जाते. विशेष म्हणजे, काही कंपन्या कर्जासाठी ऑनलाईन मंजुरीही देत आहेत. परिणामी, शोरूममध्ये टीव्ही अथवा अन्य होम अप्लायन्सेस खरेदी केलेला ग्राहक वस्तू घेऊनच बाहेर पडत आहे. 

टीव्ही घेताना हे पाहा    
- टीव्हीचा आकार
- पिक्‍सल्स 
- बदलणारे दर 
- आवाज 
- आयपीएस/व्हीए पॅनेल 
- पिक्‍चर इंजिन
- विजेचा वापर 

असा हा टीव्ही 
- सोनी, सॅमसंग, एलजी, पॅनासॉनिक, जापनीज ब्रॅन्ड तोशिबा, डच ब्रॅंड फिलिप्स, व्हीयू, मायक्रोमॅक्‍स, सॅन्यो, शार्प, रिलायन्स रिकनेक्‍ट आदी ब्रॅंडस्‌ उपलब्ध  
- भारतात टीव्हीच्या कोणत्याही ब्रॅण्डवर जास्तीत जास्त एक वर्षाचीच वॉरंटी
- पॉवर क्वालिटी चांगली नसल्यामुळे अनेक ठिकाणी टीव्ही खराब होण्याचे प्रमाणही जास्त 
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जितका जास्त, तितका टीव्ही ब्रॅण्ड महाग   
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले एखादे मॉडेल पाहण्यास, खरेदी करण्यासाठी अधिक गर्दी  
- आकार, तंत्रज्ञान, किंमत पाहूनच खरेदी  
- क्‍युअर, लिक्विड ल्युमिनस, फोर के अल्ट्रा एचडी, डीडीबी एलईडी टीव्ही, विंडोज पॉवर्ड, स्मार्ट, एलईडी असेही प्रकार