कर्जमाफी यादीवरून शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या यादीवरून शेतकरी हवालदिल झाला आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार होती. प्रत्यक्षात प्रमाणपत्र दिलेले शेतकरी वगळता इतरांची यादीच सरकारच्या संकेतस्थळावरून गायब झाली आहे.

कोल्हापूर - कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या यादीवरून शेतकरी हवालदिल झाला आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार होती. प्रत्यक्षात प्रमाणपत्र दिलेले शेतकरी वगळता इतरांची यादीच सरकारच्या संकेतस्थळावरून गायब झाली आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे रखडलेले चावडी वाचन  सुरू झाले असले तरी त्यानंतरची प्रक्रिया मोठी आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांत मात्र प्रचंड अस्वस्थता आहे. 

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी योजना जाहीर केली. दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे जाहीर केले गेले. प्रत्यक्षात प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांनाच कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे दिली गेली. इतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून रक्कम जमा होणार होती. प्रत्यक्षात रक्कम जमा झालेली नाही. दुसरीकडे सरकारने संकेतस्थळावर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची यादी लाभार्थी म्हणून प्रसिद्ध केली होती, ती यादीच गायब झाली आहे. 

‘अपडेट’च्या नावाखाली ही यादीच दिसत नाही. 
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे रखडलेले चावडी वाचन आजपासून सुरू झाले. बुधवारी जिल्ह्यातील चावडी वाचन पूर्ण होईल. त्यानंतर पुन्हा लाभार्थ्यांची छाननी तालुकास्तरीय समितीकडून होणार आहे. या समितीत बॅंकेचे अधिकारी, सहकार विभाग व लेखा परीक्षक आहेत. त्यांच्याकडून छाननी करताना दीड लाखावरील रक्कम संबंधितांनी भरली का नाही, हे बघितले जाणार आहे. एखाद्या शेतकऱ्याने ही रक्कम भरली नसेल तर योजनेत पात्र असूनही त्यांना लाभ मिळणार नाही. त्यातही ही सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल, असे दिसत नाही. दुसरीकडे पात्र म्हणून जाहीर केलेली यादीच संकेतस्थळावर गायब झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास उशीर लागणार असे चित्र आहे. 

१३ कॉलममधील माहिती मागवली
सहकार विभागाने जिल्हा बॅंकेकडून पुन्हा एकदा १३ कॉलमची माहिती मागवली आहे. त्यात दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी, या खातेदाराची सद्यस्थिती व संबंधितांना दीड लाखावरील रक्कम भरली की नाही, या माहितीचा समावेश आहे. दीड लाखावरील रक्कम भरली असेल तरच संबंधितांना दीड लाखापर्यंतचा लाभ मिळणार असल्याने बॅंकेच्या दृष्टीने पुन्हा डोकेदुखीच वाढवली आहे.

‘त्या’ २७ शेतकऱ्यांचे पैसे आले
दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा बॅंकेने पैसे जमा करून हिशेब करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याप्रमाणे आज या २७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ लाख ७४ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. २७ शेतकऱ्यांत एकच शेतकरी दीड लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेला होता.