देवीच्या दारात वाद नको, संवाद हवा 

देवीच्या दारात वाद नको, संवाद हवा 

कोल्हापूर - मंदिराचा परिसर म्हणजे तिथे वातावरण प्रसन्न हेच अपेक्षित; पण गेल्या काही वर्षांत कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या वाट्याला रोज काही ना काही गोंधळ आला आहे. यापूर्वी देवीची नवरात्रातील रोज नव्या रूपातील पूजा देशभरातील भाविकांपर्यंत या ना त्या माध्यमातून पोचत होती. आज रोज एका आंदोलनापासून ते देवीच्या ठिसूळ झालेल्या मूर्तीपर्यंतची छायाचित्रे क्षणात भाविकांपर्यंत पोचत आहेत. यातल्या कोणत्या प्रश्‍नात किती तथ्य, कोणत्या प्रश्‍नात किती गंभीरता हा जरूर महत्त्वाचा मुद्दा आहे; पण या क्षणी महालक्ष्मी मंदिर म्हणजे तेथे काहीतरी वाद असणारच, ही समजूत दृढ होईल, असे वातावरण तयार होऊ नये, याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. 

शुक्रवारी देवीच्या पूजेत घागरा चोळीचा वापर करण्यात आला. प्रथमच असा प्रकार घडला. त्यामुळे आणखी एका वाद्‌ग्रस्त मुद्द्याची भर पडली आहे; पण हे वाद खूप टोकाला गेले किंवा तापत राहिले, तर त्याचे परिणाम खूप विचित्र होणार आहेत. चांगली पूजा, चांगला धार्मिक कार्यक्रम, चांगला उपक्रम, भाविकांना चांगली सेवा हे झाले तरच भाविकांचा ओघ वाढणार आहे. रोज वाद होत राहिले, तर मंदिराची प्रसन्नताच संपून जाणार आहे. 

मंदिरातील देणगी पेटी, मंदिरातील कधीच सुरू न झालेली वातानुकूलित यंत्रणा, मूर्तीवरील रासायनिक संवर्धन, पुजारी, देवस्थान समितीतील वाद, गाभाऱ्यात महिलांना प्रवेश, किरणोत्सवातील वर्षानुवर्षाचे अडथळे, लाडू प्रसादाचे टेंडर, देवस्थानच्या जमिनीचा गैरव्यवहार, मंदिराच्या आवारात उन्हात तापणार नाही, असा मोठा गाजावाजा करून बसवलेली फरशी, देवीच्या ओटीतील साडीची लांबी, नवरात्रातील वशिल्यांच्या भाविकांना प्रवेश आणि महालक्ष्मी मंदिराचा दरवर्षी खालचा मुद्दा वर व वरचा मुद्दा खाली करून सादर केला जाणारा विकास आराखडा अशा वाद्‌ग्रस्त मुद्द्यांनी मंदिराला घेरून सोडले आहे. त्यात शुक्रवारी बांधलेल्या देवीच्या घागरा चोळीतील पूजेमुळे आणखी भर पडली आहे. 

महालक्ष्मीवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. कोल्हापूरचं बरेचसे अर्थकारण महालक्ष्मी मंदिरावर अवलंबून आहे. देवीला रोज बाहेरगावाहून रोज दहा ते बारा हजार भाविक येतात. नवरात्राच्या काळात हा आकडा लाखांच्या घरात पोचतो. दीपावली, मे महिन्याच्या सुटीतही हीच परिस्थिती असते. त्यामुळे दागिने, कपडे, कोल्हापुरी चप्पल, उपहारगृहे, धर्मशाळा, यात्री निवास, हॉटेल, रिक्षा, प्रसाद, हार, फुले या व्यवसायात लाखोंची उलाढाल होते. महालक्ष्मीला आलेला भाविक रंकाळा, पन्हाळा, जोतिबा, नृसिंहवाडीला जातो. त्यामुळे तेथेही उलाढाल होत राहते. त्या उलाढालीवर असंख्य कुटुंबाची गुजराण होते. त्याहीपेक्षा देशभरातील भाविक पर्यटकांना कोल्हापूरचे धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक महत्त्व कळायला मदत होते. 

देवीचा मूळ प्रसाद खडीसाखर व फुटाण्याचा. गोरगरीब भाविकांना परवडणारा; पण गेल्या काही वर्षांपासून प्रसादात लाडू आणला गेला व हा लाडू टेंडरच्या घोळात बदनाम झाला. मंदिराच्या आवारात भाविकांच्या पायाला उन्हामुळे चटके बसू नयेत म्हणून "वेगळी' फरशी गाजावाजा करून बसवली गेली. ही फरशी उन्हात तापत नाही. त्यामुळे पायाला चटके बसत नाहीत, असे सांगितले गेले; पण फरशी प्रकरण बनावट निघाले. आजही या फरशीवर पाय ठेवला की चटके बसतच आहेत. मध्यंतरी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचा मुद्दा गाजला; पण या महिला आंदोलन करत गाभाऱ्यातून प्रवेश करून बाहेर आल्यानंतर हा मुद्दा बाजूला पडला. ज्यांनी गाजावाजा करून प्रवेश केला, त्यांनीही पुन्हा गाभाऱ्यात राहू दे मंदिरात कधी प्रवेश केलेला नाही. महालक्ष्मी मूर्तीची झीज मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मूर्तीवर रासायनिक संवर्धन केले आहे. मूळ मूर्तीच्या किरीटावर नागप्रतिमा होती की नाही, हे आता कोणालाही माहीत नाही, या मुद्द्यावर रोज उलटसुलट पत्रके निघत आहेत. हे सर्व थांबवून संवादावर भर दिला तर नक्कीच भाविकांचा ओघ आणखी वाढेल. 

भाविकांचा ओघ वाढवावा 
भाविक परंपरेने किंवा कोल्हापूरची ओळख पूर्वापार पसरली असल्याने येथे येतात. भाविक येथे यावेत म्हणून विशेष काही प्रयत्न होत नसतानाही रोज भाविकांचा ओघ आहे. वास्तविक भाविकांचा हा ओघ अधिक कसा वळेल, ते येथे अधिक काळ कसे राहतील. इथल्या आर्थिक उलाढाली कशा वाढतील, या अनुषंगाने प्रयत्न व्हायला हवे होते; पण तसे होताना दिसत नाही. 

आम्ही महालक्ष्मीचे भक्त आहोत; मात्र अलीकडच्या काळात मंदिराचे व्यापारीकरण होत चालले आहे. हे मंदिर कोणाची तरी मक्तेदारी झाली आहे. महालक्ष्मी सर्वांची आहे. त्या देवीच्या पूजेच्या नावाखाली खेळ होऊ नये म्हणूनच आम्ही आंदोलन केले. महालक्ष्मी कोणा एका व्यक्तीची किंवा समूहाची नाही. 
संजय पवार  शिवसेना जिल्हाप्रमुख 

देवीची पूजा कोणती बांधावयाची, हा श्रीपूजकाच्या नित्य पूजेचा भाग आहे.  त्यामुळे देवस्थान समितीने पूजेच्या विधीत हस्तक्षेप केला नाही. 
धनाजी जाधव  व्यवस्थापक  महालक्ष्मी मंदिर 

जर काही हरकती सूचना असतील तर जरूर संबंधितांनी आमच्याशी चर्चा करावी. मूर्तीचे संवर्धन व्हावे म्हणून श्रीपूजकांनीच पुढाकार घेतला आहे. 1992 पासून मूर्तीवर अभिषेक बंद केले आहेत. देवीच्या पूजेची आमची 54 वी पिढी आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत नेहमीच श्रीपूजकांनी पुरोगामी भूमिका घेतली आहे; पण श्रीपूजकाबद्दल वेगळा चष्माच असेल, आम्ही किती जणांना भूमिका समजावून सांगू शकणार आहे. 
माधव मुनीश्‍वर, करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्री पूजक..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com