शहीद स्फूर्तिकेंद्रातून देश सेवेची ऊर्जा!

संदीप खांडेकर
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - देशाच्या सीमेवर लढताना जवान शहीद झाला... त्याच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी सारा गाव लोटला...काही दिवस जवानांच्या शौर्याचे गोडवे गायिले... त्यानंतर महिना-दोन महिन्यांनंतर जवानांच्या कुटुंबाची ससेहोलपट सुरू झाली... कुटुंबाकडे कोणच लक्ष देईनासे झाले... ही परिस्थिती टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना देश रक्षणासाठी चेतवण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे शहीद स्फूर्ती केंद्राची स्थापना केली आहे.

कोल्हापूर - देशाच्या सीमेवर लढताना जवान शहीद झाला... त्याच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी सारा गाव लोटला...काही दिवस जवानांच्या शौर्याचे गोडवे गायिले... त्यानंतर महिना-दोन महिन्यांनंतर जवानांच्या कुटुंबाची ससेहोलपट सुरू झाली... कुटुंबाकडे कोणच लक्ष देईनासे झाले... ही परिस्थिती टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना देश रक्षणासाठी चेतवण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे शहीद स्फूर्ती केंद्राची स्थापना केली आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात हे केंद्र सुरू होत असून विद्यार्थ्यांना आर्मी व पोलिस दलात भरती होण्यासाठी आवश्‍यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे कॅप्टन संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुबीयांच्या भेटीसाठी साताऱ्याला गेले होते. या भेटीनंतर सातारा येथे शहीद स्फूर्तिकेंद्र स्थापन करण्याची  संकल्पना त्यांच्या मनात घोळत राहिली. त्यांनी असे केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि बघता-बघता हे केंद्र आकाराला आले आहे. आर्मी व पोलिस दलामध्ये नोकरीच्या संधी काय आहेत, त्याला लागणारी आवश्‍यक कौशल्ये कोणती आहेत, याचे प्रशिक्षण देण्याची सोय केंद्रात उपलब्ध केली जात आहे. त्यासाठी आर्मी व पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे. 

 शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनानंतर कुटुंबीयांची परवड होऊ नये, याची दक्षता केंद्रातर्फे घेतली जाणार आहे. त्यासाठी शहीद कुटुंबातील मुला-मुलींमध्ये कौशल्ये कोणती आहेत, हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आर्मी व पोलिस दलातून निवृत्त झालेल्या लोकांची जगण्याची एक वेगळी शिस्त असते. त्यांना नागरी जीवनाचा अधिक परिचय करून देत सामाजिक कार्यात त्यांनी योगदान द्यावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या केंद्रांचे समन्वयक म्हणून लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ काम पाहणार आहेत. केंद्रासाठी एक समितीही स्थापन केली असून, त्यात पोलिस दल व आर्मीतील जवानांचा समावेश आहे. 

हे केंद्र सुरू होत असल्याचा अत्यानंद होत आहे. शहीद कुटुंबीयांसाठी असे केंद्र सुरू करणे, ही विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी आहे. येत्या बुधवारी (ता. ९) ऑगस्ट क्रांतिदिनी त्याचे उद्‌घाटन होत आहे.’’ 
 - डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

Web Title: kolhapur news martyr spirit

टॅग्स