मोबाईल सेवा कंपनीकडून चौदाशे वसूल करूनच थांबले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

कोल्हापूर  - त्यांचा मोबाईल अगदी साधा. कॅमेरा नाही. नेट नाही. अर्थात फेसबुक, व्हॉटस्‌अप, गेम असलं काहीही नाही. फोन आला की, हिरवं बटण दाबायचं. बंद करताना लाल बटण दाबायचं, एवढंच त्यांना माहीत. गरजेनुसार ते तीस-चाळीश रुपयांचा रिचार्ज करायचे. फोनवर मोजकेच बोलायचे. रोज झोपताना "बॅलन्स' किती आहे, हे बघायचे; मात्र सकाळी उठले की, मोबाईल बघताना रात्रीत तीन रुपये बॅलन्स कमी झाला असल्याचे त्यांना दिसायचे. 

पहिल्यांदा त्यांना वाटले, होत असेल चुकून; पण न बोलताही तीन रुपये बॅलन्स कट हा रोजचा प्रकार पाहून ते वैतागले. तक्रारी केल्या; पण कोण दखल घ्यायला तयार नाही. मग मात्र एक दिवस हे चक्क ग्राहक न्यायालयात गेले आणि पटणार नाही, मोबाईल कंपनीकडून त्यांचे कट झालेले 1400 रुपये वसूल करावेत, हा आदेश घेऊनच ते थांबले. 

श्री. सदाशिव सुतार यांनी साधा मोबाईल घेतला. मोबाईलवर ते नेमकेच बोलून आपला बॅलन्स पुरवून पुरवून वापरायचे. रोज रात्री झोपताना शिल्लक बॅलन्स बघायचे; पण सकाळी उठून पाहिले की, त्यात तीन रुपये कमी दिसायचे. त्यांनी रिचार्ज मारणाऱ्याकडे चौकशी केली. जेथून मोबाईल घेतला त्यांच्याकडे चौकशी केली; पण समाधानकारक उत्तर कोणालाही देता आले नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीला पत्रे लिहिली; पण उत्तरही आले नाही. या काळात रोज तीन रुपये याप्रमाणे त्यांचे 1400 रुपये कट झाले होते. त्यानंतर मात्र त्यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. अध्यक्षा सविता भोसले, सदस्या रूपाली घाटगे, तसेच मनीषा कुलकर्णी यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. वस्तुस्थिती पाहिली व मोबाईल कंपनीने सदाशिव सुतार यांना त्यांचे कट केलेले 1400 रुपये देण्याचे आदेश दिले. 

स्वातंत्र्यदिनी निर्धाराची गरज 
म्हटलं तर बाब फक्त तीन रुपयांची आहे. असे रोज कट झालेले पैसे किरकोळ म्हणून त्याकडे कोणी लक्ष देत नाही, हे देखील खरे आहे; पण हुपरीच्या सदाशिव श्रीपती सुतार या सामान्य माणसाने चार वर्षे ग्राहक न्यायालयात झुंज देऊन आपला हक्क मिळवला आहे. रोज तीन रुपये विनाकारण कट करण्याचा अधिकार कोणत्याही मोबाईल कंपनीला नाही, हे त्यांनी कागदोपत्री सिद्ध करून घेतले आहे. त्यांच्या मते या आधुनिकतेच्या जगात आपल्यासारख्या सामान्य माणसांना नकळत बंधनात आणले जात आहे; पण कंपन्या कितीही मोठ्या असोत, त्यांना आपण एक रुपयाही फुकट द्यायचा नाही, हा या स्वातंत्र्यदिनी निर्धार करण्याची गरज आहे. 

Web Title: kolhapur news mobile