विमान उतरण्यासाठी मोबाईल टॉवर अडथळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  ‘‘कोल्हापूर विमानतळावर विमान उतरण्यासाठी एका मोबाईल टॉवरचा अडथळा येत असून, तो तातडीने हटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत’’, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.

कोल्हापूर -  ‘‘कोल्हापूर विमानतळावर विमान उतरण्यासाठी एका मोबाईल टॉवरचा अडथळा येत असून, तो तातडीने हटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत’’, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.

विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाची पाहणी केली. त्यामध्ये कोणत्या त्रुटी किंवा अडचणी राहिल्या आहेत का? याचीही या वेळी पाहणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

कोल्हापुरातील विमानसेवा तत्काळ सुरू करून नागरिकांना सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी छोट्या-छोट्या त्रुटी किंवा अडचणींचा निपटारा झाला पाहिजे. विमानसेवा सुरू होण्याआधी सर्व सुविधा तयार ठेवण्यासाठी राज्य शासन व विमान प्राधिकरण सर्व पाहणी करून घेत आहे. आज दुपारी विमानतळाची पाहणी करून विमान उतरण्यासाठी कोणते अडथळे ठरतात. आणखी कोणत्या सुविधा असायला हव्यात याची चौकशी व पाहणी केली.

या वेळी विमान उतरताना येथे असणारा मोठा मोबाईल टॉवर अडथळा ठरणार आहे; मात्र हा मोबाईल टॉवर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. शक्‍य तेवढ्या लवकर प्राधिकरणकडून आलेल्या सूचनांचा निपटारा केला जाईल. त्यामुळे विमानतळाची बाजू सक्षम ठेवल्यानंतर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण राहणार नाही. याच ठिकाणी शिवाजी विद्यापीठाच्या बाजूने आलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीचाही अडथळा येऊ शकतो का याचीही पाहणी केली; मात्र हा अडथळा प्रथमदर्शनी तरी वाटलेला नाही. तरीही यावर विचार होण्याची शक्‍यता आहे.    

दरम्यान, कोल्हापूर विमानतळ विकास आराखड्यातील एकूण खर्चाच्या वीस टक्के म्हणजेच ५५ कोटी इतकी रक्कम राज्य शासन देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची यापूर्वीच घोषणा केली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली होती. त्यावेळी विमानतळ डागडुजीसाठी लागणाऱ्या २७४ कोटींच्या खर्चापैकी काही रक्कम राज्य शासनाने देण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५५ कोटींच्या निधीची घोषणा केली.

कोल्हापूरचे विमानतळ सुरू होण्यासाठी संसदेमध्ये वारंवार आवाज उठविला तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली होती. विमानतळ सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही याबाबत तारांकित प्रश्‍न विचारला होता. या सर्वांची दखल घेऊन आज हे पथक पाहणीस आले होते.
- धनंजय महाडिक, खासदार

Web Title: kolhapur news Mobile Tower Interruption airplane landing