गोकुळ संघ अध्यक्ष बदलाच्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या खऱ्या; पण यासंदर्भात संचालकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी नेत्यांनी बोलवलेली आजची (ता. ९) बैठक अचानक रद्द झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. बैठकीत माजी आमदार महादेवराव महाडिक संचालकांची मते जाणून घेणार होते. 

कोल्हापूर - जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या खऱ्या; पण यासंदर्भात संचालकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी नेत्यांनी बोलवलेली आजची (ता. ९) बैठक अचानक रद्द झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. बैठकीत माजी आमदार महादेवराव महाडिक संचालकांची मते जाणून घेणार होते. 

गेले महिनाभर ‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्ह्यात गाजत आहे. सभेत झालेल्या गोंधळावरून विरोधकांनी संचालकांसह नेत्यांनाही चांगलेच धारेवर धरले. सलग दोन सभा विद्यमान अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्या अंगलट आल्या. यावर्षी २५ सप्टेंबरला झालेल्या सभेतील प्रकाराने तर संघाच्या परंपरेलाच गालबोट लागले. गेली अडीच वर्षे श्री. पाटील अध्यक्ष असले तरी त्यांनी कामातून कोणतीही छाप पाडलेली नाही. दुसरीकडे संघाची बदनामी होत आहे. त्यातून श्री. पाटील यांनाच बदलण्यासाठी इतर संचालकांकडून दबाव वाढल्याची चर्चा आहे. 

वार्षिक सभेत जे काही घडले, त्याबद्दल सर्व संचालक अनभिज्ञ होते. विषयपत्रिकेचे वाचन आणि ते मंजूर म्हणायचे अधिकार नसताना श्री. महाडिक यांनीच हे सर्व सोपस्कार पूर्ण केल्याने संचालक अवाक्‌ झाले. 
बैठकीनंतरच बहुतांशी संचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. सभेत अध्यक्षांनीच नव्हे, तर इतरांनीही उत्तरे दिली नाहीत. दोन दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी संघावर मोर्चा काढला, त्या वेळीही विश्‍वास पाटील गैरहजर राहिले. विरोधकांनी या विषयावरून रान उठवल्याने संचालकांत नाराजी आहे. ही नाराजी नेत्यांपर्यंतही पोचवल्याने अध्यक्ष बदलाच्या हालचालींनी वेग घेतला होता.

अजून अडीच वर्षांनी संघाची निवडणूक आहे. सद्यःस्थितीत आमदार सतेज पाटील संघाच्या विरोधात ताकदीने उतरण्याची शक्‍यता आहे. गेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांबरोबर राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ अडीच वर्षांनी त्यांच्यासोबत नसतील हे नक्की आहे. त्यातच एका सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी आपण महाडिक-पी. एन. यांच्यासोबत पाच वर्षे राहण्याचा शब्द दिल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जाताना ताकदीचा, विरोधकांना जशास तसे उत्तर देणारा अध्यक्ष असावा, हेही राजकारण या मागे आहे. एक-दोन दिवसांत ही बैठक होऊन त्यात अध्यक्ष बदलावर चर्चा शक्‍य आहे.

यांची नावे चर्चेत
विद्यमान संचालक मंडळात विश्‍वास पाटील यांच्याशिवाय अरुण नरके, रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील व अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक आहेत. अध्यक्ष बदल हा नक्की आहे. त्यावर बैठकीतच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. नव्या अध्यक्षपदाचे दावेदार म्हणून डोंगळे, नरके, आपटे व रणजित पाटील या क्रमाने नावे चर्चेत आहेत.

Web Title: Kolhapur News movement to change Gokul President